मुंबई : कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती आज टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुंबईतील मुख्यालयात मुख्य प्रशिक्षकासह गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि फलंदाज प्रशिक्षकासाठीही मुलाखती सुरू झाल्या आहेत. पण, सर्वांचे लक्ष लागले आहे ते मुख्य प्रशिक्षक कोण असेल, याकडे. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवानंतर रवी शास्त्रींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे या पदावर ते कायम राहतात की नवा चेहरा निवडला जातो, हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. पण, नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंतच असणार आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
IANSशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. ''मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मुख्य प्रशिक्षक निवडीची पुन्हा प्रक्रिया पार पडेल. यासह सपोर्ट स्टाफलाही ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपर्यंतच करार देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वांच्या स्पर्धा लक्षात घेता, नव्यानं मुलाखती होतील.''
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्याकडून शास्त्री यांना कडवी लढत मिळू शकते. 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत यांच्या अर्जावरही गांभीर्याने विचार होऊ शकतो. तसेच, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले आहेत. पण, रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे. कर्णधार विराट कोहलीनंही त्याचे पारडे शास्त्रींच्या तराजूत टाकले आहे.
कोण आहेत शर्यतीत?
रवी शास्त्री : हे सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षक आहे. भारताकडून खेळताना त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याचबरोबर समालोचनही त्यांनी केले आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शास्त्री यांना या पदावर कायम ठेवणार की त्यांचे हे पद जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रवी शास्त्री हे संघाचे जून 2016 पर्यंत संचालक होते. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली.
टॉम मूडी : मुडी हे श्रीलंकेचे प्रशिक्षक आहेत. मुडी हे सनरायजर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहतात.
रॉबिन सिंग : भारतीय उमेदवारांपैकी रॉबिन सिंग हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. ते सर्वकालिक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहेत. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षकदेखील होते.
लालचंद राजपूत : लालचंद राजपूत हे 2007 मध्ये झालेल्या पहिल्या ट्वेंटी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि अफगाणिस्तानच्या संघाचे प्रशिक्षकपदही त्यांनी भूषवले आहे.
फिल सिमन्स : सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे.
माईक हेसन : हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आहेत. 2015 साली त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
Web Title: Team India Head Coach: India head coach to be given contract till 2021 ICC T20 World Cup by BCCI: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.