राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण होणार याबाबत बरीच चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदाच्या शर्यतीत माजी खेळाडू गौतम गंभीर आघाडीवर आहे. अलीकडेच खुद्द गंभीरने याबद्दल मौन सोडले असून, आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा कोणता मोठा सन्मान नाही, असे गंभीरने सांगितले.
दरम्यान, आता माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. वृत्तसंस्था ANI शी बोलताना गांगुली म्हणाले की, मला टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल. तसेच जर गौतम गंभीर हे पद स्वीकारत असेल तर तो या पदासाठी योग्य उमेदवार असेल, असेही गांगुलींनी नमूद केले.
गंभीर म्हणाला होता की, तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. या पदावर असताना तुम्ही १४० कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचेही प्रतिनिधित्व करत असता. जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत असता... तेव्हा यापेक्षा मोठा सन्मान तो काय असू शकतो? पण मी भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी कशी मदत करू शकतो? मला वाटते की भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करणारे १४० कोटी भारतीय आहेत. जर प्रत्येक भारतीय आमच्यासाठी प्रार्थना करू लागला आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो तर भारत विश्वचषक जिंकेल यात शंका नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भय असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मला विचाराल तर होय, मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायला आवडेल.
BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -
- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे.
- प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.
- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा.
Web Title: Team India Head Coach Job Sourav Ganguly's big statement after Gautam Gambhir expressed his wish
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.