Rahul Dravid Shikhar Dhawan, Team India: IPL 2022 च्या हंगामानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ९ जूनपासून ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली, तर केएल राहुलला संघाचा कर्णधार करण्यात आले. या मालिकेच्या निमित्ताने टी२० संघात हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. तर IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनाही प्रथमच संघात समाविष्ट करण्यात आले आहे. पण काही खेळाडूंना मात्र या मालिकेसाठी डावलण्यात आले आहे. यामध्ये सर्वात आश्चर्यचकित करणारे एक नाव म्हणजे शिखर धवन.
शिखर धवनने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली. परंतु तरीही त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. यावर अनेक दिग्गज क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघाची घोषणा होण्यापूर्वीच भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वतः धवनला फोन करून त्याची निवड का होत नाहीये, हे सांगितले होते, असं बोललं जातंय.
राहुल द्रविडच्या निर्णयाला साऱ्यांचीच सहमती
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'इनसाइड स्पोर्ट'ने वृत्त दिले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, शिखर धवनने गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली. पण टी२० मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुण खेळाडूंना संधी देण्याची BCCIची इच्छा आहे. राहुल द्रविडला हा अवघड निर्णय घ्यावा लागला आणि सर्वांनी त्याच्याशी सहमती दर्शवली. पण संघाची घोषणा होण्यापूर्वी खुद्द राहुलने शिखरला फोन करून ही माहिती दिली होती.
'धवन टी२० प्लॅनिंगमध्ये कुठेच नाही'
अधिकारी म्हणाले की, योजना अगदी सोपी आहे. जेव्हा तुमच्याकडे ऋतुराज गायकवाड, इशान किशन, केएल राहुल आणि संजू सॅमसनसारखे टॉप ऑर्डरचे फलंदाज असतात, तेव्हा तुमच्यासाठी असे निर्णय घेणं अवघड असते. द्रविडला नक्की काय हवंय, याची त्याला स्पष्ट कल्पना आहे. अर्थात शिखर धवनबद्दल आम्हा सर्वांच्या मनात खूप आदर आहे. यामुळेच त्याने धवनला फोन करून माहिती दिली की आमच्या टी२० प्लॅनमध्ये तो कुठेच नाही.