Rahul Dravid, IND vs SL: टीम इंडियाने २०२३ च्या वन डे विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेची सुरुवात चांगली झाली. पहिल्या सामन्यात, टॉप ३ फलंदाजांनी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माने ८३ धावांची खेळी केली. त्याचे शतक हुकले पण तो चांगल्या लयीत दिसला. सलामीवीर शुभमन गिलनेही ६० चेंडूत ७० धावा केल्या. तर विराट कोहलीने ११३ धावांची शतकी खेळी केली. केएल राहुलने मात्र पुन्हा एकदा निराशा केली. त्यानंतर आता माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत प्रशिक्षक राहुल द्रविडवर टीका केली आहे.
गुवाहाटीच्या वन डे सामन्यात ३९ धावांवर बाद झालेल्या केएल राहुलबाबत मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला, "मला वाटतं की केएल राहुलच्या बाबतीत खेळाचे स्थैर्य ही मोठी समस्या आहे. राहुल द्रविड हे संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. प्रशिक्षकांनी ही समस्या जाणून घेऊन त्याच्याशी नीट संवाद साधायला हवा आणि त्याला त्याची भूमिका नीट समजावून सांगायला हवी. तो एक महान खेळाडू आहे, परंतु सध्या त्याला स्थैर्य मिळणे खूप महत्वाचे आहे."
"केएल राहुल गेल्या काही सामन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बाद होताना दिसत आहे. ही गोष्ट एखाद्या संघाच्या महत्त्वाच्या फलंदाजाच्या बाबतीत फारशी चांगली नाही. तो चांगल्या चेंडूच्या वेळी बाद होत असता तर त्याचे श्रेय गोलंदाजाला देता आले असते. पण सध्या तो खराब शॉट सिलेक्शन म्हणजेच चुकीच्या फटक्यांच्या निवडीमुळे बाद होत असल्याचे दिसत आहे. ही टीम इंडियासाठी नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते," असेही अझरुद्दीन म्हणाला.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी चांगल्या पद्धतीने खेळून पुनरागमन केले आहे. ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे. त्यांचे फॉर्ममध्ये परतणे हे खूप महत्त्वाचे होते. दोघेही वरिष्ठ खेळाडू आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहेत. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू वन डे विश्वचषकातही नक्कीच चांगली कामगिरी करतील," असा विश्वासही अझरूद्दीनने व्यक्त केला.
दरम्यान, केएल राहुलबद्दल आधीच प्रश्न उपस्थित केले जात होते. तो बऱ्याच दिवसांपासून कोणतीही मोठी इनिंग खेळू शकलेला नाही. त्याचप्रमाणे त्याचा स्ट्राईक रेटही चिंतेचा विषय बनला आहे. खराब फॉर्ममुळे केएल राहुलकडून उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. तसेच सध्याही अजूनही यष्टिरक्षक म्हणून संघाशी संबंधित आहे.