कोलकाता : भारत आणि श्रीलंका (Srilanka ) यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 15 जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. यासाठी भारतीय संघ उद्या दुपारी एक वाजता विमानाने तिरुवनंतपुरम रवाना होणार आहे. मात्र, या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड तिरुवनंतपुरमला जाणार नाही.
प्रकृतीच्या कारणास्तव उद्या राहुल द्रविड बंगळुरूला आपल्या घरी जाणार आहे. "भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघासोबत तिरुवनंतपुरमला जाणार नाहीत. वैद्यकीय कारणास्तव तो उद्या सकाळी बंगळुरूला जाणार आहे", असे सांगण्यात येत आहेत. दरम्यान, तिरुवनंतपुरमध्ये आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय सामना झाला आहे. हा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला होता. यामध्ये भारताने बाजी मारली होती. अशा परिस्थितीत या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड चांगला आहे.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामना पार पडला. एकापाठोपाठ दुसऱ्या सामन्यात भारताने जोरदार विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला आहे. राहुलच्या आणि पांड्याच्या खेळीमुळे हा विजय भारतीय संघाच्या पारड्यात पडला.
या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 215 धावा करत 216 धावांचे आव्हान त्यांनी भारतीय संघाला दिले. परंतु, फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघातील वरची फळी सोप्यात बाद झाली. त्यामुळे हा सामना रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला.