नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणार आहेत. या मैदानावर टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध कामगिरी शानदार आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांच्या भूमीवर २-१ ने पराभूत केले आणि आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. उभय संघांदरम्यान ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंड संघाबाबत चर्चा केली तर या संघाने श्रीलंकेचा दोन सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला असून त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. त्याचसोबत त्यांना भारतीय वातावरणात खेळण्याचा अनुभवही मिळाला आहे. त्यामुळे कसोटी सामने रंगतदार होतील, याच कुठली शंका नाही. पण, चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियानेच वर्चस्व गाजवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अशा स्थितीत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले तर आश्चर्य वाटयला नको. चेन्नईचे एम.ए. चिदम्बरम स्टेडियम भारतासाठी लकी ठरले आहे. चेपॉकच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून तर दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे.
या मैदानावर आतापर्यंत उभय संघांदरम्यान ९ कसोटी सामने खेळल्या गेले असून त्यात भारताने पाच सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने तीन सामन्यांत सरशी साधली आहे. एक सामना अनिर्णीत संपला. हा सामना १९८२ मध्ये खेळला गेला होता. एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये यापूर्वी उभय संघांदरम्यान शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला गेला होता. त्यात टीम इंडियाने एक डाव ७५ धावांनी विजय मिळवला होता. त्यावेळी येथे करुण नायरने त्रिशतकी खेळी केली होती आणि भारतातर्फे वीरेंद्र सेहवागनंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा दुसरा खेळाडू ठरला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने ज्यो रुटच्या ८८ व मोईन अलीच्या १४६ धावांच्या खेळीच्या जोरावर ४७७ धावांची मजल मारली होती. भारताने प्रत्युत्तरात करुण नायर (नाबाद ३०३) व लोकेश राहुल (१९९) यांच्या कामगिरीच्या जोरावर ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव २०२ धावांत संपुष्टात आला.चेन्नईमध्ये भारताने आतापर्यंत एकूण ३२ कसोटी सामने खेळले त्यात १४ सामन्यांत विजय, ६ सामन्यांत पराभव तर ११ सामने अनिर्णीत राहिले.