भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज के. एल. राहुल याच्या उजव्या जांघेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. लोकेश राहुलने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. आता भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्याने सांगितले आहे. दरम्यान, लोकेश राहुलच्या या पोस्टवर त्याचे सासरे सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर राहुलची पत्नी आथिया शेट्टी हिने ही पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे.
आयपीएलमध्ये लोकेश राहुल लखनौ सुपरजायंट्स संघाचं नेतृत्व करत होता. दरम्यान, बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान राहुलला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे लोकेश राहुलला आयपीएलमधील उर्वरित सामने आणि जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यालाही मुकावे लागणार आहे. केएल राहुलच्या जागी ईशान किशनला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच स्थान देण्यात आलं आहे. हा सामना ७ ते १२ जूनदरम्यान, इंग्लंडमधील ओव्हलवर खेळवला जाणार आहे.
लोकेश राहुलने आपल्या इन्स्टाग्राम पोसवर पुढे लिहिले की, आता मी अधिकृतपणे दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. मी पूर्णपणे फिट होण्यासाठी आणि मैदानावर पुनरागमन करण्यासाठी कटिबद्ध आहे. के. एल. राहुलच्या या इन्स्टा पोस्टवर सूर्यकुमार यादव, शिखर धवन यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच चाहत्यांनीसुद्धा त्याच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे. राहुलच्या या पोस्टवर त्याचे सासरे सुनील शेट्टी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या लोकेश राहुलने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक आणि एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पुनरागमन करण्याचं लक्ष्य आपल्यासमोर ठेवलं आहे. आता या मोठ्या स्पर्धांपूर्वी तो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्यात यशस्वी होईल की, नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारतीय संघ दुखापतींशी झुंजत आहे. रिषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यानंतर अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे सुद्धा दुखापतग्रस्त झालेले आहेत. तर जयदेव उनाडकट हाही जखमी झाला आहे, सध्या तो एनसीएमध्ये तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे.