Join us  

विजयी लय कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार

बासेटेरे, सेंट किट्स व नेव्हिस : पाच सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला आता सोमवारी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 5:23 AM

Open in App

बासेटेरे, सेंट किट्स व नेव्हिस : पाच सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला आता सोमवारी दबदबा कायम राखण्याच्या उद्देशानेच खेळावे लागणार आहे.  भारतीय संघ सोमवारी दुसऱ्या टी-२०साठी वेस्ट इंडिजशी भिडणार आहे.  

या वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाला पाहता भारतीय संघ या प्रारूपाकडे गंभीरतेने पाहत आहे. वेस्ट इंडिजविरोधात सुरुवातीच्या टी-२० सामन्यात दोन देशांच्या संघांत प्रत्येक विभागात खूप अंतर बघायला मिळाले. रोहितने रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि रवी बिश्नोई या तीन फिरकीपटूंचा अंतिम ११ मध्ये समावेश करत चतुर नेतृत्वाचा परिचय करून दिला. त्याने त्यासोबतच सूर्यकुमार यादवसोबत डावाची सुरुवात करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.इंग्लंडविरोधात या प्रारूपात रोहितने यष्टिरक्षक ऋषभ पंतसोबतच डावाला सुरुवात केली होती. अशामुळे सूर्यकुमार यादव या वर्षी टी-२०त सातवा सलामीवीर बनला. त्याने आक्रमक फलंदाजी करत १६ चेंडूंत २४ धावा केल्या होत्या. 

लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापन सलामीवीरांसाठी प्रयोग करतो का, हे पाहणे नक्कीच रंजक ठरेल.भारतीय संघाला बऱ्याच काळापासून चांगल्या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाची उणीव भासत आहे. मात्र अर्शदीप सिंह याने पहिल्या टी-२०मध्ये प्रभावित केले आहे.  पंजाबच्या या २३ वर्षांच्या खेळाडूने चार षटकांत कुठेच ढिलाई केली नाही. त्याने शॉर्ट बॉलचा वापर करत काईल मार्यसला बाद केले होते. अखेरच्या षटकातील त्याच्या यॉर्करपुढे अकील हुसेनकडे उत्तरच नव्हते.

मागच्या सामन्यात रोहित शर्माने ४४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर मधली फळी अडखळली. अखेरच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकने १९ चेंडूंत ४१ धावा करत संघाला १९० पर्यंत पोहोचवले. या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करावी लागेल. अश्विन आणि बिश्नोईच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांकडे कोणतेही उत्तर नव्हते.अश्विनही टी-२०त अजून बरेच योगदान देऊ शकतो, हे त्याने त्याच्या खेळीने दाखवून दिले. तर २१ वर्षांच्या बिश्नोईनेदेखील सिद्ध केले की तो मोठ्या सामन्यासाठी तयार आहे. आता संघ व्यवस्थापन जडेजा, अश्विन आणि बिश्नोई यांना कायम ठेवणार की अक्षर आणि कुलदीप यांना संघात स्थान देणार हे बघावे लागेल.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग.वेस्ट इंडीज : निकोलस पुरन (कर्णधार), शामराह ब्रूक्स, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, कीसी कार्टी, काइल        मायर्स, जेसन होल्डर, गुडाकेश मोती, किमो पॉल, शाय होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, जेडन सील्स. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ
Open in App