Jasprit Bumrah Fitness : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तोंडावर अनेक संघांना ताफ्यातील खेळाडूंच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघही दुखापतीच्या ग्रहणात सापडणार का? असा प्रश्न आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेपूर्वी निर्माण झाला आहे. यमागचं कारण जसप्रीत बुमराहच्या फिटनेससंदर्भात गुलदस्त्यात असणारे रिपोर्ट्स आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. यातून सावरून तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी फिट होईल, अशी आशा अजूनही आहे. पण बीसीसीआयने अद्याप त्याच्या फिटनेससंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहच्या फिटनेसचं काय?
तो आगामी आयसीसी स्पर्धेसाठी फिट की, अनफिट हा तिढा अजूनही कायम आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, स्कॅनसह अन्य वैद्यकिय फिटनेस चाचणीनंतर आता ११ फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बुमराहच्या सहभागासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. तो फिट नसेल तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्काच असेल.
इंग्लंड विरुद्धच्या वनडेला मुकला, फिटनेसवरच ठरणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा फैसला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर स्पर्धेतील अखेरच्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे बुमराहनं मैदान सोडलं होते. त्यानंतर त्याला पाच आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. एका बाजूला इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका सुरु असताना दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराह फिटनेस टेस्टसाठी बंगळुरुस्थिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहचला होता. सर्व चाचण्या पार पडल्यावर फायनली त्याच्या फिटनेसबद्दल काय बातमी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्याचा सहभाग फिटनेसवरच अवलंबून असेल, हे कॅप्टन रोहित आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधीच सांगितले आहे.
बुमराह अनफिट असेल तर हा असेल पर्याय
जर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराह फिट नसेल तर हर्षित राणाच्या रुपात नव्या भिडूला दुबईचं तिकीट मिळू शकते. इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात त्याचा प्रयोगही झाला आहे. आता पुढच्या २४ तासांत अखेर काय निर्णय होणार? चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल होणार की बुमराहचा सहभाग असलेला आधीचा संघ कायम राहणार ते पाहण्याजोगे असेल.