भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज खेळाडू लवकरच निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता आहे. नाईलाजास्तव हे तिन्ही दिग्गज निवृत्ती स्वीकारू शकतात. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही काळापासून त्यांची भारतीय संघामध्ये निवड झालेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द जवळपास संपुष्टात आलेली आहे. या खेळाडूंनी अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नसली तरी त्यांचं भारतीय संघात पुनरागमन होणं कठीण झालेलं आहे. हे तीन खेळाडू पुढीलप्रमाणे.
या खेळाडूंमध्ये पहिला नंबर लागतो तो इशांत शर्माचा. भारताकडून १०० हून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या इशांत शर्माला बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालेलं नाही. त्याने शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर गेला. मात्र सध्या भारतीय संघात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्यासह जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांनी स्थान पक्कं केलेलं असल्याने इशांत शर्माचं संघातील पुनरागमन कठीण झालेलं आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये ३११ विकेट्स मिळवणारा इशांत शर्मा लवकरच निवृत्ती स्वीकारू शकतो.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर ऋद्धिमान साहानं भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. मात्र रिषभ पंतच्या उदयानंतर साहाला संधी मिळणे कमी झाले. त्यामुळे २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केल्यापासून त्याला केवळ ४० सामनेच खेळता आले आहेत. यात त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके फटकावली आहेत. मात्र आता ३७ वर्षीय ऋद्धिमाना साहा हा बीसीसीआयच्या भविष्यातील योजनेमध्ये समाविष्ट नाही आहे. त्यामुळे त्याच्यासमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
या यादीतील तिसरा खेळाडू आहे करुण नायर. करुण नायरने इंग्लंडविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती, तेव्हा त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते. मात्र नंतरच्या काळाता त्याला अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही. तसेच कसोटी संघातील स्थानही टिकवता आलं नाही. त्याने आपला पहिला कसोटी सामना २०१६ मध्ये खेळला होता. तर शेवटचा सामना २०१७ मध्ये खेळला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये एकूण ६ सामने खेळले. त्यात त्याने ६२.३३ च्या सरासरीने ३७४ धावा काढल्या. त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ३०३ होती. मात्र आता बरीच वर्षे संघाबाहेर राहिल्याने त्याच्यासमोरही निवृत्तीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.