भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध खेलल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याची तयारी करत आहे. यातच सर्वांच्या नजरा संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे लागल्या आहेत. काही दिवसांपासून रोहितचा फॉर्म अत्यंत खराब आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका खेळण्यासही नकार दिला होता. तेव्हापासून त्याच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनीही रोहितवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कपिल देव रोहितवर नाराज - आयपीएल 2022 मध्ये रोहित शर्माची कामगीरी अत्यंत निराशाजनक राहिली. यानंतर अंदाज वर्तवला जात होता, की तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत फॉर्म शोधण्याचा प्रयत्न करेल. मात्र त्याने विश्रांती घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. यावरून, कपिल देव रोहितवर प्रश्न उपस्थित करत म्हणाले, रोहितने स्वतः विश्रांती घेतली होती, की त्याला विश्रांती घेण्यास सांगितले होते? हे केवळ सिलेक्टर्सनाच माहीत आहे.
कपिल देव म्हनाले, 'रोहित शर्मा हा एक अत्यंत उत्कृष्ट फलंदाज आहे, यात शंकाच नाही. पण आपण 14 सामन्यांमध्ये पन्नासपर्यंतही पोहोचू शकत नसाल तर, प्रश्न तर उपस्थित होणारच. मग, गॅरी सोबर्स असोत की डॉन ब्रॅडमन, विराट कोहली असो अथवा सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर असो किंवा विव्ह रिचर्ड्स, दीर्घकाळ खराब फॉर्ममध्ये राहिल्यास प्रश्न उपस्थित होतीलच. नेमके काय होत आहे याचे उत्तर केवळ रोहित शर्माच देऊ शकतो. याला जबाबदार क्रिकेटचे अधिक दडपण आहे, की त्याने फलंदाजीचा आनंद घेणेच सोडून दिले आहे.
कोहलीवरही भडकले कपिल देव -कपिल देव यांनी विराट कोहलीच्या फॉर्मवरही प्रश्न उपस्थित केला आहे. अनकटवरील संभाषणात विराट कोहलीसंदर्भात बोलताना कपिल देव म्हणाले, 'जर तुम्ही धावा करत नसाल, तर लोकांना हे वाटेलच की काही तर गडबड आहे. लोक फक्त तुमचा परफॉर्मन्स बघतात आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर लोकांकडून गप्प बसण्याची अपेक्षा करू नका.