मुंबई - इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघा आज पहाटे रवाना झाला. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात होत असून, या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. या विश्वचषक स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असल्याने स्पर्धा अधिकच आव्हानात्मक बनली आहे. तसेच विजेतेपद मिळवण्यासाठी पहिल्या चेंडूपासून झुंज द्यावी लागणार आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केले आहे. इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत 1992 नंतर प्रथमच राऊंड रॉबिन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघ 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीमधून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय संघात महेंद्र सिंह धोनी हा सर्वात अनुभवी खेळाडू असून, त्याने याआधी तीन विश्वचषकांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर कर्णधार विराट कोहलीने याआधी दोन विश्वचषकात संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. विशेष म्हणजे 2011 मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये धोनी आणि विराट कोहलीचा समावेश होता.
या विश्वचषकात सुरुवातीपासूनच संघाची कसोटी लागणार आहे, कारण संघाचे पहिले चारही सामने आव्हानात्मक आहेत, असे विराटने म्हटले आहे. स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्यानंतर 9 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल, तर 13 जून रोजी भारताला न्यूझीलंडशी दोन हात करावे लागतील. त्यानंतर 16 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल.
मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे. दरम्यान, ''2015नंतर अफगाणिस्तान सारख्या संघानेही बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. प्रत्येक सामना हा संपूर्ण ताकदीनं आणि शंभर टक्के योगदान देऊन खेळण्याची गरज आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळपट्ट्या कशा आहेत यापेक्षा तणाव कसा हाताळतो, हे महत्त्वाचे आहे.''