Team India Star Cricketer Story, IND vs BAN: टीम इंडिया १९ सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. भारताचा पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन बांगलादेश विरुद्धच्या या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. रविचंद्रन अश्विनकडे ऑफ स्पिन, लेग स्पिन, दूसरा आणि कॅरम बॉल यांसारखे विविध व्हेरिएशन्स आहेत. सध्या तो ICC कसोटी क्रमवारीत जगातील नंबर-1चा गोलंदाज आहे. पण १४व्या वर्षी त्याला बोट कापून टाकण्याची धमकी मिळाली होती. तसे झाले असते तर भारत एका प्रतिभावान गोलंदाजाला मुकला असता.
अश्विनचे बोट कापण्याची धमकी देण्यात आली होती
रविचंद्रन अश्विनने १०० कसोटी सामन्यांमध्ये ५१६ विकेट घेतल्या आहेत आणि ३३०९ धावा केल्या आहेत. पण वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी रविचंद्रन अश्विनला बोट कापण्याची धमकी देण्यात आली होती. खुद्द रविचंद्रन अश्विनने एकदा क्रिकबझशी बोलताना हे सांगितले. रविचंद्रन अश्विनने सांगितले की, लहानपणी टेनिस बॉल स्पर्धेच्या फायनलपूर्वी त्याला विरोधी संघाकडून धोका होता. अश्विनने सांगितले की, विरोधी संघातील काही मुलांनी त्याला किडनॅप केले होते आणि धमकी दिली होती की जर तो फायनल खेळला तर त्याची बोटं कापून टाकली जातील.
अश्विन प्रचंड घाबरला होता
अश्विन म्हणाला की, माझा मित्र मला टेनिस बॉल टूर्नामेंट खेळायला सांगायचा. माझ्या वडिलांना ते आवडले नाही. ते मला रस्त्यावरही खेळू द्यायचे नाहीत. मी १४-१५ वर्षांचा होतो, काही मुलांचा घोळका आला. मी विचारले 'कोण?' तर मुलं म्हणाली तू फायनल मॅच खेळतोस ना? आम्ही तुम्हाला उचलायला आलो आहोत. ते मला त्यांच्या बाईकवर चहाच्या दुकानात घेऊन गेले. मला तिथे बसवले आणि इडली-वड्याची ऑर्डर दिली. अश्विनने मुलांना सांगितले की सामना सुरू होणार आहे, चला जाऊया. तेव्हा त्या मुलांनी सांगितले की, आम्ही विरोधी संघातील मुलं आहोत. तुला फायनल खेळण्यापासून रोखायचे आहे म्हणून इथे आणलंय. तू फायनल खेळलास तर तुझी बोटं कापून टाकू असे ते म्हणाल्याचे अश्विनने सांगितले.
अश्विनला फायनल खेळता आली की नाही?
चहाच्या टपरी अश्विन त्या मुलांना विनंती करत राहिला की माझी मॅच मला खेळू द्या. त्या मुलांनी मात्र त्याला बराच वेळ तिथून सोडलेच नाही. अखेर अश्विन म्हणाला की ४ वाजता माझे वडील घरी येतील, त्याआधी मला जाऊ दे. मग मुलांनी त्याला ४ वाजता घरी सोडले. वडील आधीच घरी आले असल्याने त्यांनी अश्विनला मुलांबद्दल विचारले. आधी अश्विन काही बोलला नाही. नंतर त्याने सारं काही खरं सांगून टाकलं.