Shoaib Akhtar, Asia Cup 2022: टीम इंडियाने (Team India) आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध विजयी सलामी दिली होती. त्यानंतर हाँगकाँगच्या संघालाही भारताने पराभूत करत दिमाखात सुपर-४ फेरी गाठली होती. पण सुपर-४ ची फेरी सुरू होताच, भारतीय संघाचं गणितंच फसलं. भारताला सुपर-४ च्या पहिल्या फेरीत पाकिस्तानने (IND vs PAK) ५ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने (IND vs SL) ६ गडी राखून पराभूत केले. भारताचा दोन सामन्यात पराभव झाल्याने आता, फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला इतर ३ संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. याच दरम्यान, भारतीय संघाचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा वेगवान माजी गोलंदाज शोएब अख्तर याचा एक प्लॅन फसला.
भारतीय संघाचे फायनलचे गणित आता इतर तीन संघांवर अवलंबून आहे. सध्या श्रीलंका २ तर पाकिस्तान १ सामना जिंकून आघाडीवर आहे. यापुढील सामन्यांमध्ये जर अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला हरवले, भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवले आणि श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाची चव चाखायला लावली, तर सुपर-४ मध्ये श्रीलंका ३ पैकी ३ सामने जिंकून थेट फायनलमध्ये जाईल. पण इतर ३ संघ १ विजय मिळवून समान गुणांवर असतील. अशा वेळी सर्वोत्तम नेट रन रेट असलेल्या संघाला फायनल गाठण्याची संधी मिळणार आहे. असे असताना अख्तरने मात्र एक मस्त प्लॅन तयार केला होता, तो आता फसल्याचे निश्चित झालं आहे.
आशिया चषकात श्रीलंकेचा संघ २ सामने जिंकून अव्वल आहे, तर भारताने २ सामने गमावल्यामुळे तो जास्तीत जास्त १ सामना जिंकू शकतो. म्हणजे भारत श्रीलंकेच्या पुढे जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणे निव्वळ अशक्य आहे. याचबाबतचा अख्तरचा प्लॅन फ्लॉप झाला. "आशिया चषक २०२२ च्या फायनलमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जावा अशी माझी इच्छा होती. मी फायनलची तिकीटेही आधीच काढून ठेवली होती", असं अख्तर म्हणाला. पण आता त्याचा पचका झाला. "मला फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानी चाहत्यांशी गप्पा मारायच्या होत्या. आता भारत-पाक सामना ऑस्ट्रेलियात टी२० वर्ल्ड कप दरम्यान होणार आहे. मी तो सामना बघायला नक्कीच जाणार आहे", असं शोएब अख्तरने आपल्या यूट्युब चॅनेलवरील व्हिडीओमधून सांगितले.
Web Title: Team India lost 2nd match in Asia Cup super 4 Pakistan Shoaib Akhtar plan failed of IND vs PAK final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.