ICC Women's World Cup 2023 मध्ये उपांत्या फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. केप टाउनमधील मैदानात खेळल्या गेलेल्या उपांत्या सामन्यात भारताला १७३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण टीम इंडियाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात १६७ धावाच करता आल्या. आता स्पर्धेचा अंतिम सामना विश्वविजेते ऑस्ट्रेलिया आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.
हरमनप्रीतचा चाहत्यांना भावनिक पत्र
या पराभवामुळे, विश्वचषक जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा तुटले. पराभवानंतर भारतीय चाहत्यांच्या आणि संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर ती निराशा स्पष्टपणे दिसून आली. त्यानंतर आता हरमनप्रीत कौर हिने जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर चाहत्यांना एक संदेश दिला आहे. हरमनप्रीत म्हणाली, "संपूर्ण विश्वचषकात जगभपरातून मिळालेल्या समर्थनाबद्दल मी चाहत्यांचे आभार मानते. आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही साऱ्यांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात याचे आम्हाला समाधान आहे. क्रिकेटचा चाहता म्हणून कोणालाही स्वत:चा संघ हरताना पाहायला आवडत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आता मी फक्त एवढंच सांगू शकते की आता आम्ही दमदार पुनरागमन करू आणि अप्रतिम कामगिरी करून पुन्हा एकदा तुमची वाहवा मिळवू."
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. संघातर्फे बेथ मुनीने अर्धशतक झळकावले. तिने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तर मेग लॅनिंगनेही ३४ चेंडूत ४९ धावा केल्या. तिने नाबाद खेळी करत ४ चौकार आणि २ षटकार मारले. तर अॅशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्माच्या आणि स्मृती मानधना स्वस्तात बाद झाल्या. काही वेळाने यास्तिका भाटियाही ४ धावांवर बाद झाली. मात्र, जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. जेमिमाच्या ४३ धावा आणि हरमनप्रीत कौरच्या ५२ धावा यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. पण अखेरीस भारताला ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.