IND vs ENG 2nd T20: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाला आज मालिका जिंकायची संधी आहे. हा सामना खूपच असण्यामागचे एक कारण म्हणजे विराट कोहलीला संघात घेण्यात आले आहे. टीम इंडियाने या मॅचमध्ये 'होलसेल' म्हणजेच चार बदल केले आहेत. या होलसेल बदलांमुळे टॉस दरम्यान असं काही झालं की रोहित शर्मा खेळाडूंची नावंच विसरला.
दुसऱ्या टी२० या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माला संघातील बदलांबाबत विचारले असता तो म्हणाला की, विराट कोहली संघात परतला आहे. त्याच्याशिवाय रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह देखील संघात आले आहेत. याशिवाय ऋषभ पंतचे नाव असलेले चौथे नाव मात्र रोहित शर्मा पूर्णपणे विसरून गेला.
महत्त्वाची बाब अशी की या सर्व खेळाडूंनी ५ जुलै रोजी संपलेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. अशा परिस्थितीत हे खेळाडू ७ जुलै रोजी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे बाकीच्या खेळाडूंना संधी मिळाली होती. पण आता हे खेळाडू शेवटच्या दोन टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असणार आहेत.
दुसऱ्या टी-२० साठी भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल