Mohammad Shami Team India: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कप पासून विशेष चर्चेत आहे. वर्ल्डकप मध्ये त्याने सर्वात कमी सामने खेळले पण तरीही त्याला सर्वाधिक २४ बळी मिळाले. त्याच्या भेदक माऱ्याने भलेभले फलंदाज ढेपाळले. सध्या मोहम्मद शमी दुखापतीमुळे विश्रांती घेत आहे. घोट्याच्या दुखापतीने तो त्रस्त आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर आहे. याच दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
निवृत्तीबाबत काय म्हणाला शमी?
घोट्याच्या दुखापतीमुळे झालेली इजा कितपत गंभीर आहे आणि त्यातून शमी कधी बरा होणार याबाबत सध्या फारशी स्पष्टता नाही. पण सध्या या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत शमी निवृत्ती घेणार का? असा सवाल वारंवार विचारला जातो. त्यावर शमीने नेटवर्कएटीन रोखठोक उत्तर दिले, "ज्या दिवशी मला क्रिकेटचा कंटाळा येईल, तेव्हाच मी स्वत:च ते सोडण्याचा निर्णय घेईन. मला कशाचाही विचार करून डोक्यावरचं ओझं वाढवायचं नाही. मला कुणीही समजावून सांगणारा माणूस नाही. माझ्या कुटुंबातील कोणीही मला काहीही सांगत नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी मी सकाळी उठलो आणि मला वाटले की मला कंटाळा आला आहे तर त्याच दिवशी मी स्वतः ट्विट करेन की मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे."
बायोपिकबद्दल काय म्हणाला?
शमीचा बायोपिक येणार असल्याच्या बातम्याही आल्या आहेत. मात्र, यात कोण कोण असेल याचा खुलासा झालेला नाही. पण आता शमीनेच त्याच्या बायोपिकच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. तो म्हणाला, "हो, माझा बायोपिक येणार आहे असे मी पण ऐकले आहे. जर त्यातला अभिनेता फायनल झाला नसेल तर क्रिकेट सोडल्यानंतर मीच माझ्याच बायोपिकमध्ये स्वत:ची काम करेन."
कोहली, रोहितबद्दल आणि आवडता कर्णधार
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फलंदाजीबाबत शमीला प्रश्न विचारण्यात आले. यावर शमी म्हणाला, "विराट कोहली खूपच तंत्रशुद्ध आणि प्रेमाने खेळतो. रोहित याउलट आहे. तो जोर लावून फटकेबाजी करतो. चेंडू लांबवर मारण्याचा त्याचा विचार असतो आणि त्यात तो यशस्वी होतो. दोघेही आपापल्या खेळातील सर्वोत्तम आहेत. रोहित शर्मा विराटपेक्षा धोकादायक फलंदाज आहे. पण एक कर्णधार म्हणून मला महेंद्रसिंग धोनी अधिक खास वाटतो. कारण त्याने 3-3 ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीसारखी कामगिरी आजपर्यंत कोणीही करू शकलेले नाही."