नवी दिल्ली : भारताने इंदूर कसोटी गमविल्यानंतर डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळायचा झाल्यास अहमदाबाद येथे ९ मार्चपासून खेळविण्यात येणारी चौथी कसोटी जिंकावी लागेल. ऑस्ट्रेलियाने मात्र या विजयासोबतच अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमविल्यास भारताचेही अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल.
डब्ल्यूटीसी गुणतालिका २०२१-२३ मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या संघाची तिसऱ्या सामन्यांनंतर विजयाची टक्केवारी ६८.५२ टक्के आहे. त्याचबरोबर भारताची विजयाची टक्केवारी पराभवानंतर ६०.२९ टक्क्यांवर आली आहे. श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची विजयाची टक्केवारी ५३.३३ टक्के आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ५२.३८ टक्के आहे. भारतीय संघ पराभूत झाला, सामना अनिर्णीत किंवा टाय झाला तर फायनलसाठी श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेच्या निकालावर विसंबून राहावे लागेल. भारताने अहमदाबादमध्ये विजय मिळविला आणि लंकेने न्यूझीलंडला २-० ने पराभूत केल्यास भारत फायनल खेळू शकेल.
खेळपट्टीवर निघाला प्रेक्षकांचा राग!ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना भारताने अडीच दिवसांहून कमी कालावधीमध्ये गमावल्यानंतर भारतीय प्रेक्षकांनी आपला सर्व राग होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर काढला. विशेष म्हणजे होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला फलंदाजांचे नंदनवन म्हटले जाते. मात्र, हीच खेळपट्टी या सामन्यात फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली. केके राय नावाच्या चाहत्याने म्हटले की, ‘जर का, कसोटी क्रिकेटचे निकाल असेच झटपट लागले, तर खेळाला त्याचा फटका बसेल. यामुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व समाप्त होईल. सध्या भारतात केवळ फिरकी गोलंदाजांसाठीच खेळपट्टी तयार केली जात आहे. हे योग्य नाही.’ तसेच, हरिओम आंजना या चाहत्याने तर तिकीट फाडून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशाच प्रकारे अनेक चाहत्यांनी बीसीसीआयला आता गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आपला राग व्यक्त केला.