Team India News: भारतीय टीमच्या नेट्समध्ये शुक्रवारी मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) थ्रो डाऊन स्पेशालिस्टच्या भूमिकेत दिसला. खर तर माजी कर्णधार धोनीकडून विराट कोहली अँड कंपनीला मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे आणि तो ते करतही आहे. पण, शुक्रवारी नेट्समध्ये त्याला गोलंदाजी करताना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीवर ही वेळ का आली याची माहिती नंतर समोर आली. टीम इंडियाच्या फलंदाजांचा सराव करून घेण्यासाठी बीसीसीआयनं निवडलेल्या नेट गोलंदाजांपैकी चौघांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघासोबत नेट गोलंदाज म्हणून वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम, उम्रान मलिका, आवेश खान, हर्षल पटेल व लुकमन मेरीवाला हे होते आणि यापेकी वेंकटेश, कर्ण, शाहबाज व गौथम यांनी टीम इंडियाचा कॅम्प सोडला. आागमी मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेसाठी हे खेळाडू आपापल्या संघांत सहभागी होण्यासाठी मायदेशात परतले आहेत. आता पुढील दोन आठवडे टीम इंडियाला नेट सेसनमध्ये पुरेपूर सराव कसा मिळेल, याची काळजी बीसीसीआयला घ्यावी लागेल. उम्रान, आवेश, हर्षल व लुकमन हे संघासोबतच आहेत.
''स्पर्धा सुरू झाल्यानंतर टीम इंडियाला फार नेट सेशन नसतील. त्यामुळे जे फिरकीपटू संघासाठी फायद्याचे आहेत त्यांनी मायदेशात जावे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत आपापल्या संघाकडून खेळावे, असे निवड समितीला वाटते. त्यांना मॅच प्रॅक्टीसची गरज आहे. तसंही येथे एवढ्या उकाड्यात निवडक सराव सत्रासाठी अधिकच्या फिरकीपटूंची गरज वाटत नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं PTI ला सांगितले.
टीम इंडियाचे वेळापत्रक ( India's schedule at T20 World Cup)
- भारत वि. पाकिस्तान, दुबई - २४ ऑक्टोबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- भारत वि. न्यूझीलंड, दुबई - ३१ ऑक्टोबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- भारत वि. अफगाणिस्तान, अबु धाबी - ३ नोव्हेंबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- भारत वि. स्टॉटलंड, दुबई - ५ नोव्हेंबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- भारत वि. नामिबिया, दुबई - ८ नोव्हेंबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून