Virender Sehwag, Team India: T20 World Cup 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर बरीच टीका होत आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने निवडकर्त्यांना २००७ च्या विश्वचषकाची आठवण करून दिली. पुढील विश्वचषकात खराब कामगिरी केलेल्या वरिष्ठ खेळाडूंना घरी बसवा आणि आता थोडे कठोर निर्णय घेऊन निवड करा, असा सल्ला दिला.
“मी खेळाडूंची मानसिकता आणि इतर सर्व गोष्टींबद्दल बोलणार नाही, परंतु मला संघात बदल नक्कीच पहायचा आहे. मला पुढच्या विश्वचषकात काही चेहरे बघावेसे वाटत नाहीत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांसारखे दिग्गज २००७च्या T20 विश्वचषकातून स्वत:हून बाहेर पडले होते, हे सिलेक्टर्सने लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले होते. इतकी वर्षे खेळलेले दिग्गज त्या विश्वचषकाला गेले नाहीत. तरुणांचा एक गट गेला आणि त्यांच्याकडून कोणाचीही अपेक्षा नव्हती तेव्हा त्यांनी विजय खेचून आणला. मला पुढील टी-२० विश्वचषकासाठी अशाच प्रकारचा संघ पाहायचा आहे. ज्यांच्याकडून विजयाची अपेक्षा कोणीही करणार नाही, संघाच्या भविष्याची बांधणी त्यात दिसेल, असा संघ आता तयार करायला घ्या," असे सेहवाग म्हणाला.
सेहवागने डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारलेल्या नवीन निवड समितीला पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी काम सुरू करण्याचे आवाहन केले. "तुम्ही संघाच्या भविष्याचा विचार आत्ताच केलात, तरच तुम्ही दोन वर्षात एक संघ तयार करू शकाल. पुढच्या विश्वचषकात मला काही नॉन-परफॉर्मिंग सीनियर्स बघायला आवडणार नाही. मला आशा आहे की निवडकर्ते त्यादृष्टीने कठोर निर्णय घेतील,” असे सेहवाग स्पष्टपणे बोलला. "समस्या ही आहे की हे निवडकर्ते पुढच्या विश्वचषकापर्यंत टिकतील का हे कळत नाही. सिलेक्शन पॅनल असेल, नवे मॅनेजमेंट असेल, नवा दृष्टिकोन असेल त्यामुळे ते बदल करतील का? पण एक गोष्ट निश्चित आहे की जर ते पुढच्या विश्वचषकातही तुम्ही एकाच संघासह आणि त्याच दृष्टिकोनासह गेलात तर निकालही सारखाच असेल," असेही सेहवाग म्हणाला.
Web Title: Team India Non Performing seniors should be sacked Virender Sehwag burst into anger on Selection Committee
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.