Team India, Asian Games: हांगझू येथे होणाऱ्या आशियाई खेळांच्या क्रीडा कार्यक्रमात क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या खेळाचा विविध खंडांमध्ये अधिक प्रचार व प्रसार होण्यात मदत होईल. पण या स्पर्धेत भारतीय खेळाडू एक खेळ सोडून इतर सर्व खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. तो खेळ म्हणजे क्रिकेट. बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे की भारतीय संघ आशियाई खेळामध्ये सहभागी होणार नाही. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (ओसीए) च्या सर्वसाधारण सभेत या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करावा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारतीय संघ इतर आशियाई संघांसोबत खेळताना दिसेल असे बोलले जात होते. पण बीसीसीआयने आपला संघ पाठवणार नसल्याचे सांगितल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
बीसीसीआयकडून या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. भारतीय पुरूष आणि महिला संघाने आधीच संपूर्ण वर्षाचे कार्यक्रम आखलेले असतात. त्यानुसार भारतीय महिला आणि पुरूष संघ काही दौऱ्यांवर असणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला आशियाई गेम्समध्ये सहभागी होता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. "भारताच्या यंदाच्या आशियाई गेम्समध्ये सर्व खेळांमध्ये सहभाग आहे पण एका खेळात नाही- तो खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळात आपण सहभागी होणार नाही", असे भारताचे आशियाई गेम्सच्या मिशनचे प्रमुख भुपेंदर बाजवा यांनी सांगितले.
आता होणाऱ्या मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आठ वर्षांनंतर हा खेळ आशियाई क्रीडा स्पर्धेत परतत आहे. पण भारतीय उपखंडातील अनेक मोठे संघ यात सहभागी होणार नाहीयेत. 1900 च्या ऑलिम्पिकमध्ये आणि 1998 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट फक्त एकदाच खेळले गेले. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत हा खेळ पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. 2010 मध्ये आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा पदकांचा खेळ म्हणून प्रथम समावेश करण्यात आला होता आणि 2014 मध्ये तो चालू राहिला. आता यंदा पुन्हा या खेळाचा समावेश झाला आहे.