दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. या कामगिरीसह भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारताचे रेटिंग गुण ११६ झाले आहेत. त्यामुळे भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (११५ गुण) अव्वल क्रमांकावरून हटवले.
भारतीय संघ कसोटी, टी-२० क्रमवारीत याआधी अव्वल स्थानावर होता. त्यामुळे आता भारतीय संघ तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अग्रस्थानी पोहोचला आहे. भारताकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे दोन गुणांनी नुकसान झाले आहे. पण ऑस्ट्रेलिया संघ १११ गुणांसह अद्यापही तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर क्रमवारीत आणखी बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अनेकदा अव्वल स्थानावर राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यात भारताची घसरण झाली होती. पण आता भारतीय संघ पुन्हा लयीत परतल्यामुळे अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या कामगिरीत सातत्य राखण्याचा रोहित शर्मा आणि टीमचा प्रयत्न असेल.
क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी घटना
पुरुष क्रिकेटच्या इतिहासात एखादा संघ तिन्ही प्रकारात अव्वल स्थानावर पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेने ऑगस्ट २०१२ मध्ये अशी शानदार कामगिरी केली होती. त्यांनी २०१२ मध्ये कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत इंग्लंडला पराभूत केले होते.
Web Title: Team India 'One Number'; India tops in all three categories simultaneously
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.