T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचं ट्वेन्टी-२० वर्ल्डकप विजयाचं स्वप्न अखेर भंगलं आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं आहे. भारतीय संघाचा उद्याचा नामेबियाविरुद्धचा सामना शिल्लक असला तरी न्यूझीलंडनं आज अफगाणिस्तानवर मात केल्यानं किवी उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. तर पाकिस्ताननं याआधीच आपली पात्रता सिद्ध केली आहे. भारतीय संघानं उद्याचा सामना जिंकला तरी देखील संघाला ६ गुणांवरच समाधान मानावं लागणार आहे. केवळ औपचारिकता म्हणून उद्याचा सामना होणार आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे.
आयपीएल संपल्यानंतर लगेचच ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली. भारतीय संघ वर्ल्डकपसाठी सर्वात मोठा दावेदार संघ मानला जात होता. कारण भारतीय खेळाडू आयपीएलमुळे बराच काळ यूएईमध्येच क्रिकेट खेळत होते आणि याचा फायदा भारताला होईल असं मानलं जात होतं. यासोबत ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या सराव सामन्यात भारतीय संघानं दमदार कामगिरी केली होती. भारतीय संघाचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध होता आणि याच सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. आजवर आयसीसीच्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारताचा पाकिस्तानकडून एकदाही पराभव झालेला नव्हता. पण यावेळी पाकिस्ताननं भारताला पराभूत करत नव्या इतिहासाची नोंद केली. पाकिस्ताननं भारतावर १० विकेट्सनं मात केली. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला ८ विकेट्सनं धूळ चारली. भारतानं स्कॉटलंड आणि अफगाणिस्तानवर दमदार विजय प्राप्त केला खरा पण तोवर खूप उशीर झाला. संघाचं आव्हान आता सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं आहे.