Join us  

IND vs BAN 1st Test: १२ वर्षानंतर संधी मिळाली, पण नशिबाने माती खाल्ली! भारतीय गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार?

उद्यापासून भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 7:41 PM

Open in App

IND vs BAN 1st Test: भारतीय संघ बुधवारपासून बांगलादेश विरुद्ध (IND vs BAN) मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार आहे. वन डे मालिकेत भारतीय संघ २-१ ने पराभूत झाला. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी संघ खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्यांशी झुंजत आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिली कसोटी खेळू शकणार नाही. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजाही जखमी असल्याचे बोलले जातेय. तशातच आता आणखी एका खेळाडूच्या संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२०१० मध्ये भारताकडून एकमेव कसोटी खेळणाऱ्या जयदेव उनाडकटचा आताच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र आजपर्यंत तो बांगलादेशपर्यंत पोहोचू शकलेला नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय वेगवान गोलंदाजाला त्याच्या व्हिसाची कागदपत्रे मिळालेली नाहीत आणि बोर्ड त्याला बांगलादेशला नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मंगळवारपर्यंत उनाडकट अजूनही राजकोटमध्ये घरी असल्याचे समजते. अशा स्थितीत तो पहिल्याच सामन्यातून बाहेर पडला आहे.

BCCIचे प्रयत्न सुरू

BCCI आधीच सर्व खेळाडूंसाठी व्हिसाची व्यवस्था करते, जे संभाव्य दौऱ्यावर जाऊ शकतात. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा विलंब टाळता येईल. पण उनाडकटचे प्रकरण थोडे वेगळे आहे. तो निवड समितीच्या रडारच्या बाहेर होता. त्याचा संघातील समावेश हा अचानक घेतलेला निर्णय होता. या कारणास्तव त्याचे प्री-बुकिंग झाले नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१० मध्ये खेळला होता.

संघातील एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज

भारताच्या संघात जयदेव उनाडकट हा एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो फक्त एकच कसोटी खेळला असेल, पण लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. सौराष्ट्रचे कर्णधार असलेल्या उनाडकटने ९६ प्रथम श्रेणी सामन्यात ३५३ बळी घेतले आहेत. फलंदाजीतही त्याने १८च्या सरासरीने १,७३२ धावा केल्या आहेत. त्याने ११६ लिस्ट ए सामन्यात १६८ विकेट घेतल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ
Open in App