Mohammad Shami Car Video: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा मोहम्मद शमी सध्या आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीने जगातील फलंदाजांना पाणी पाजणाऱ्या टीम इंडियाच्या या गोलंदाजाने आपल्या कारचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आपल्या गोलंदाजीच्या वेगाप्रमाणेच कारचा वेगही महत्त्वाचा असतो असं कॅप्शन लिहित त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मोहम्मद शमीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर आपल्या कारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्याबाजूला लाल रंगाची आलिशान जग्वार कार दिसत आहे. या पोस्टसोबत त्यांने लिहिले आहे की, 'Speed matters' म्हणजेच, गतिशील असणं हे खूप महत्त्वाचं आहे!
कारची किंमत कोटींच्या घरात!
शमीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही कार खरेदी केली होती. या कारची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. जग्वार कंपनीची ही F-Type स्पोर्ट्स कार आहे. ती रस्त्यावर धावताना अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने पळते. ही स्पोर्ट्स कार १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग केवळ 5.7 सेकंदात पकडू शकते. या कारच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास ही कार ताशी २५० किलोमीटर वेगाने धावू शकते.
शमीच्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक शमीला कमी वेगाने गाडी चालवण्याचा सल्ला देतानाही दिसत आहेत. जग्वार व्यतिरिक्त मोहम्मद शमीकडे ऑडी, टोयोटा फॉर्च्युनर आणि BMW-5 सीरीज सारख्या अनेक आलिशान कार आहेत.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वन डेमध्ये शमीला विश्रांती दिली जाते की खेळवलं जातं याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. मालिकेतील हा शेवटचा सामना असून तो उद्या २४ जानेवारीला इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली असून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे संघात काही बदल पाहायला मिळू शकतात.