Ind vs SA, 3rd Test: भारताला आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे मूळ कारण म्हणजे गोलंदाजांमधील आक्रमकतेचा अभाव. २४० धावांच्या आव्हानाचा बचाव करताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज स्नायूंच्या दुखापतीमुळे जायबंदी झाला. त्यामुळे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि शार्दूल ठाकूर यांच्यावरील ताण वाढला आणि परिणामी भारताला हवी तशी आक्रमकता दाखवता आली नाही. आता तिसरी आणि अखेरची कसोटी केपटाऊनला खेळवण्यात येणार असतानाच भारताच्या स्टार खेळाडूच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोहम्मद सिराज अद्याप स्नायूंच्या दुखापतीतून सावरला नसल्याचे स्पष्ट केल्याने भारताचं टेन्शन वाढल्याची चिन्हं आहेत.
दुसऱ्या कसोटी दरम्यान सिराजच्या स्नायूंवर ताण आला आणि तो जायबंदी झाला. आतातरी तो पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नसल्याने तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होईल की नाही, याबद्दल निश्चित सांगणं कठीण आहे. "सिराज सध्या पूर्णपणे फिट नाही. त्याच्या दुखापतीबद्दल वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. पुढील चार दिवसात तो फिट होईल की नाही याचा अंदाज येईल. फिजिओ देखील त्याच्या स्नायूंच्या दुखापतीबाबत स्कॅनिंग करत आहेत", असंही सांगण्यात आले.
दरम्यान, केपटाऊनच्या मैदानावर भारताचा कसोटी इतिहास फारसा चांगला नाही. १९९३ ते २०१८ या कालावधीत भारताने ५ कसोटी सामने खेळले असून त्यात तीन सामने भारत पराभूत झाला. उर्वरित दोन सामने अनिर्णित राहिले. पण भारताला सामना जिंकला आला नाही. २०१८च्या मालिकेतही पहिला सामना याच मैदानावर खेळण्यात आला होता. त्यात भारताला ७२ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा मात्र इतिहास खूपच चांगला आहे. त्यांनी ५८ पैकी २६ कसोटीत विजय मिळवला आहे. २१ वेळा त्यांना पराभूतही व्हावे लागले आहे. पण भारताला मात्र आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय हवा असेल तर आपला इतिहास बदलावा लागेल.