Join us  

Team India: मला कुठल्याही स्थानावर खेळवा, मात्र संघात स्थान द्या, सूर्यकुमार यादवची विनंती

Suryakumar Yadav: मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असतो. मी कर्णधार आणि प्रशिक्षकांनाही हे सांगितले की, तुम्ही म्हणाल त्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यास मी सक्षम आहे. पण फक्त तुम्ही मला संघात कायम ठेवा.’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 7:29 AM

Open in App

दुबई : संघ व्यवस्थापनाने कुठल्याही क्रमाकांवर फलंदाजीस पाठवले तरी आपण त्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सूर्यकुमार यादव म्हणाला. सलामीवीरापासून ते सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. तो म्हणाला, ‘मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असतो. मी कर्णधार आणि प्रशिक्षकांनाही हे सांगितले की, तुम्ही म्हणाल त्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यास मी सक्षम आहे. पण फक्त तुम्ही मला संघात कायम ठेवा.’

लोकेश राहुलला वेळ देण्याची गरजरोहित शर्मासोबत तू सलामीला येणार का, हा प्रश्न विचारल्यावर सूर्या म्हणाला, म्हणजे तुम्ही राहुल भाईला संघाबाहेर बसवण्याचे म्हणताय? मला वाटते दुखापतीतून सावरल्यानंतर लोकेश राहुल मैदानावर आपण थोडा वेळ द्यायला हवा. त्या टी-२० क्रिकेटमधला मोठा खेळाडू आहे. लवकरच राहुल एक मोठी खेळी करू शकतो. विशेष म्हणजे आम्हालासुद्धा कुठलीही घाई नाही. टी-२० विश्वचषकाला अजून वेळ आहे. तोपर्यंत राहुल नक्कीच फॉर्ममध्ये येईल.

किंग कोहली सूर्यासमोर नतमस्तकहाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमार यादवने अवघ्या २६ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा षटकार आणि ६ चौकार मारले. यातील ४ षटकार सूर्यकुमारने शेवटच्या षटकात मारले. स्टार फलंदाज विराट कोहलीने सूर्याला चांगली साथ दिली. कोहली आणि सूर्या यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४१ चेंडूत नाबाद ९८ धावांची भागीदारी केली. सूर्याचा झंझावात पाहून कोहली चांगलाच प्रभावित झाला. डाव संपल्यानंतर सूर्यकुमार यादव डगआऊटमध्ये परतत असताना कोहली त्याच्यासमोर नतमस्तक झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोहलीकडून झालेले कौतुक हृदयस्पर्शी आशिया चषकात हाँगकाँगविरुद्ध सूर्यकुमार यादवने २६ चेंडूंत ६८ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीचा झंझावात बघून विराट कोहलीसुद्धा आश्चर्यचकीत झाला होता. विजयावर शिक्कामोर्तब करताच कोहली सूर्याजवळ गेला आणि त्याने चक्क वाकून अभिवादन केले. दरम्यान कोहलीने मैदानावर दिलेल्या या शुभेच्छा आपल्या हृदयाला भिडणाऱ्या होत्या, असे सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितले.लोकेश राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी सामन्याची सूत्रे हातात घेतली. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवने आक्रमक धोरण स्वीकारत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सुरू केली. अवघ्या २२ चेंडूंत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. विराटनेही त्याला दुसऱ्या बाजूने तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी मिळून चौथ्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी करत भारताला १९२ धावांचे लक्ष्य उभारून दिले.कोहलीसोबच्या या भागीदारीबाबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, ‘डाव संपताच विराट माझ्याकडे आला आणि दोन्ही हात खाली करत मला अभिवादन करायला लागला. यावेळी तो माझ्या खेळीने इतका अचंबित होता की जवळ येताच तो मला म्हणाला, काय होते हे? त्याचे ते रूप आणि त्याने केलेले हे कौतुक हृदयाला भिडणारे होते. त्याच्या या शब्दांनी मी भावुक झालो होतो.’विराट आणि सूर्यकुमारची ९८ धावांची भागीदारी ही भारतासाठी निर्णायक ठरली. सूर्या पुढे म्हणाला, ‘विराटसारख्या इतक्या दिग्गज खेळाडूसोबत फलंदाजी करणे हे नक्कीच माझ्यासाठी गौैरवास्पद आहे. या भागीदारीवेळी त्याने काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा मला सांगितल्या. मी अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसा नवखाच आहे. अशा वेळी विराटसारख्या खेळाडूचे मार्गदर्शन माझ्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहे. तो प्रत्येक वेळी मला नैसर्गिक खेळण्यासाठी प्रोत्साहन देतो.’

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघएशिया कप 2022
Open in App