Abhishek Sharma On Rahul Dravid : भारतीय संघाचा स्टार युवा खेळाडू अभिषेक शर्माने टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. २०१८-१९ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकादरम्यान शांत, संयमी असलेल्या द्रविड यांचा रूद्रावतार भारताच्या युवा ब्रिगेडने अनुभवला. अभिषेक शर्माने सांगितले की, १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध हरला होता. त्यामुळे भारतीय खेळाडू बदला घेण्याच्या मानसिकतेत होते. त्याची संधी आम्हाला लवकरच (विश्वचषकात) मिळणार होती. द्रविड यांनीही आम्हाला प्रोत्साहन दिले होते.
तसेच विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये द्रविड यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर बांगलादेशी खेळाडूंनी तुम्हाला शिवीगाळ केली तर तुम्हीही त्यांना शिवी द्या. खरे तर २०१८ मध्ये राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली आणि पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
जेव्हा द्रविड संतापतात...
एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिषेक शर्माने विविध बाबींवर प्रकाश टाकला. अभिषेक शर्माने राहुल द्रविड यांच्याबद्दलचा हा किस्सा शेअर केला आणि सांगितले की आम्ही अंडर-१९ आशिया चषकामध्ये बांगलादेशकडून हरलो होतो. यानंतर विश्वचषकात आमचा सामना त्यांच्याशी होणार होता. तेव्हा राहुल द्रविड म्हणाले की, जर त्यांनी तुम्हाला शिवी दिली तर तुम्हीही त्याच शब्दांत प्रत्युत्तर द्या. द्रविड यांच्या तोंडी हे शब्द पाहून सगळेच अवाक् झाले. पण, त्यांचे ऐकून आम्ही खूप उत्साहित झालो.
बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात शुबमन गिलच्या ८६ धावांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा कुटल्या. अभिषेक शर्माने ४९ चेंडूत ५० धावा केल्या. या धावांचा बचाव करताना कमलेश नागरकोटीने तीन, अभिषेकने दोन बळी घेतले. भारतीय शिलेदारांनी सांघिक खेळी करून बांगलादेशचा संपूर्ण संघ १३४ धावांत गुंडाळला. यानंतर टीम इंडियाने उपांत्य फेरीत पाकिस्तानला आणि त्यानंतर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विजेतेपद पटकावले.