Abhishek Sharma News : आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकीट मिळवणारा अभिषेक शर्मा. अभिषेकने झिम्बाब्वेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद होताच दुसऱ्या सामन्यात अभिषेकने अप्रतिम शतकी खेळी केली. अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावून त्याने रूद्रावतार दाखवला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या अभिषेकला त्याच्या स्फोटक खेळीने नवीन ओळख मिळवून दिली. आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेकने शानदार कामगिरी केली. स्फोटक खेळी करताना त्याने २०४.२१ च्या स्ट्राईक रेटने १६ सामन्यांत ४८४ धावा कुटल्या. विशेष म्हणजे एका हंगामात ४२ षटकार मारण्याची किमया अभिषेकने साधली.
युवराज सिंगला आदर्श मानणाऱ्या अभिषेकवर युवीप्रमाणेच स्फोटक खेळी करण्याचे संस्कार झाले. याबद्दल तो सांगतो की, माझ्या खेळीमुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. केवळ तरूणींचेच नाही तर तरूणांचेही लक्ष वेधण्यात मी यशस्वी झालो. यामुळे खूप चांगले वाटते. हे क्षण कोणत्याही क्रिकेटपटू किंवा सेलिब्रिटीला प्रेरणा देतात. चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमामुळे आत्मविश्वास वाढतो. पॅट कमिन्स एक यशस्वी कर्णधार आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी मागील वर्षी विश्वचषक जिंकला. संघातील सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधण्यात पॅट पटाईत आहे. तो नेहमी संघातील नवीन खेळाडूंची विचारपूस करत असतो, खेळाडूंना स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या घरच्यांबद्दल कमिन्स जाणून घेत असे, असेही अभिषेकने सांगितले. तो एका मुलाखतीत बोलत होता.
तसेच मी फलंदाजी करत असताना फार विचार करत नाही. निर्भयपणे कसे खेळता येईल यावर भर देतो. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेड याचप्रकारे स्फोटक खेळी करायचा. त्याच्यामुळे मला मदत आणि प्रोत्साहन मिळत गेले. पण मला कल्पना नव्हती की, मी आक्रमक खेळल्यावर तो देखील हाच पवित्रा घेईल. आम्ही खूप लवकर जुळवून घेतले आणि असा एकही क्षण आला नाही जेव्हा आम्हाला असे वाटले की एखादा गोलंदाज आम्हाला वरचढ ठरतोय, असे अभिषेक शर्माने अधिक सांगितले.