भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन मागील काही कालावधीपासून नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्याच्या बीसीसीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणारा इशान पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला. नवी मुंबईत खेळल्या जात असलेल्या डीवाय पाटील ट्वेंटी-२० चषकात तो सहभागी झाला आहे. इशान मंगळवारी रूट मोबाईल लिमिटेडविरुद्धच्या सामन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खेळला. नवी मुंबईतील डीवाय पाटील विद्यापीठाच्या मैदानावर हा सामना झाला. पण, मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असलेल्या किशनला काही खास कामगिरी करता आली नाही. तो ११ चेंडूत १९ धावा करून तंबूत परतला.
या सामन्यात आरबीआयने प्रथम क्षेत्ररक्षण केले. इशान किशन नेहमीप्रमाणे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसला. शाहबाज नदीम, अमित मिश्रा, अंकित राजपूत, ध्रुव शोरे आणि रायन पराग यांच्यासह किशन आरबीआयच्या संघाचा भाग आहे. इशान किशन गेल्या तीन महिन्यांपासून कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. तो अखेरचा ट्वेंटी-२० सामना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. पण, मानसिक थकव्याचे कारण देत त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली.
त्याने बीसीसीआयकडून ब्रेक मागितला होता. यानंतर तो घरी परतला. यानंतर त्याची अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघात निवड झाली नाही. त्याचवेळी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले होते की, इशान किशनसाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले आहेत. मात्र, इशानला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याला स्पर्धात्मक क्रिकेट खेळावे लागेल.
राहुल द्रविड म्हणाले होते की, प्रत्येकाकडे परत येण्याचा एक मार्ग आहे. असे नाही की आपण कोणालाही कोणत्याही गोष्टीतून वगळतो. पुन्हा, मला इशान किशनच्या मुद्द्यावर जास्त चर्चा करायची नाही. त्याने आमच्याकडे ब्रेक मागितला होता, त्यानुसार आम्ही त्याला सुट्टी दिली.