भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यातून जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. तसेच लोकेश राहुल आगामी सामन्यातून परतणार का याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुखापतीमुळे राहुलला विश्रांती देण्यात आली होती. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याची प्रगती चांगली होत असल्याचे समजते. खरं तर निवड समितीने तिसऱ्या कसोटीसाठी राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कलची निवड केली होती.
लोकेश राहुल त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील चर्चेत असतो. त्याने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाहगाठ बांधली आहे. एका कार्यक्रमात बोलताना राहुलने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्याने त्याच्या आदर्श खेळाडूबद्दल खुलासा केला. यावेळी राहुलला त्याला प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल विचारण्यात आले असता त्याने म्हटले की, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी माझे वडील प्रेरणादायी आहेत. पण मला वाटते क्रिकेटच्या मैदानावर मी एबी डिव्हिलियर्सकडून खूप प्रेरित झालो आहे.
राहुलचा 'आदर्श' खेळाडूटीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना जिंकला आणि ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. आता ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटीकडे संघाचे लक्ष लागले आहे. या सामन्यात राहुल पुनरागमन करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. हैदराबाद कसोटीनंतर दुखापतीमुळे पुढील तीन सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज संघाचा भाग होऊ शकला नाही. मात्र, तो अंतिम सामन्यात पुनरागमन करू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात लोकेश राहुलने चमकदार कामगिरी केली होती. त्याने इंग्लिश संघाविरुद्ध पहिल्या डावात ८६ आणि दुसऱ्या डावात २२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ११ चौकार आणि २ षटकार आले. मात्र, संघाला विजयापर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला. भारतासाठी ५० कसोटी सामन्यांमध्ये २८६३ धावा करणारा राहुल पाचव्या कसोटीत पुनरागमन करणार का हे पाहण्याजोगे असेल.