रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ जिंकण्याची किमया साधली. सांघिक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अपराजित राहून जग जिंकले. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला गेला. भारतीय संघ मायदेशात परतताच दिल्ली विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी टीम इंडिया गेली. त्यानंतर क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडूंनी विजयाचा जल्लोष साजरा केला. या आधी मरीन ड्राईव्ह परिसरात व्हिक्टी परेड काढण्यात आली. अशातच आता चॅम्पियन भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने मोठे विधान केले आहे.
आपण लवकरच लग्न करणार असल्याचे कुलदीपने सांगितले. तो म्हणाला की, भारतीय कर्णधार रोहित शर्माने मला खूप मदत केली. माझ्या कठीण काळात तो नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला. मी एनसीएत उपचार घेत असताना त्याने सातत्याने विचारपूस करून मला प्रोत्साहन दिले. तू नक्कीच पुनरागमन करशील अशा विश्वास दिला. दुखापतीनंतर मला थेट संघात जागा मिळाली. कदाचित रोहितचा माझ्यावर हा विश्वास असावा. अन्यथा बहुतांश खेळाडूंना दुखापतीनंतर देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागते.
तसेच मी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कोणती बॉलिवूड अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची चांगली बातमी मिळेल. मी आज जिथे आहे, यामध्ये माझे प्रशिक्षक, मित्र आणि संघाचा मोठा हात आहे, असेही कुलदीप यादवने सांगितले. कुलदीप NDTV या वृत्तवाहिनीशी बोलत होता.
कुलदीपची विश्वचषकातील कामगिरी
- २/३२ विरूद्ध अफगाणिस्तान
- ३/१९ विरूद्ध बांगलादेश
- २/२४ विरूद्ध ऑस्ट्रेलिया
- ३/१९ विरूद्ध इंग्लंड
- ०/४५ विरूद्ध दक्षिण आफ्रिका
दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला.