Join us

हृदयस्पर्शी! 'बापमाणूस' शमीच्या थकलेल्या डोळ्यांना दिलासा; वर्षांनंतर बाप-लेकीची भेट, दिग्गज भावुक

मोहम्मद शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:22 IST

Open in App

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. २०१८ मध्ये शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप करत त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. यांनतर शमीची मुलगी आयरा तिच्या आईसोबत राहत असे. आपल्या लेकीला भेटण्यासाठी तरसलेल्या शमीच्या डोळ्यांना आता दिलासा मिळाल्याचे दिसते. खरे तर भारतीय क्रिकेटपटू आपल्या मुलीला भेटताच भावुक झाला. त्याने या हृदयस्पर्शी क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

आपल्या मुलीला भेटल्यानंतर मोहम्मद शमी भावनिक झाला. बऱ्याच वर्षांनंतर आपल्या मुलीला भेटतानाचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला. वडिलांना भेटल्यानंतर आयरा खूप आनंदी दिसत होती आणि मॉलमध्ये तिने खूप शॉपिंग केली. २०१८ मध्ये शमी आणि हसीन जहाँ वेगळे झाले तेव्हा आयरा फार लहान होती. बेबोची (आयरा) आठवण काढताना शमी अनेकदा कॅमेऱ्यासमोर व्यक्त झाला. त्याची पत्नी त्याला मुलीला भेटू देत नाही, असेही त्याने नमूद केले होते. मात्र, आता वर्षांनंतर आपल्या मुलीला पाहून शमीच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होते.

"खूप दिवसांनी तिला पाहिल्यावर थोडा 'वेळ' थांबला. शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतके प्रेम मी तुझ्यावर करतो, बेबो", असे मोहम्मद शमीने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले. शमी सध्या क्रिकेटपासून दूर आहे, दुखापतीमुळे तो अद्याप टीम इंडियात परतलेला नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमीच्या पुनरागमनाबद्दल अटकळ बांधली जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीभारतीय क्रिकेट संघप्रेरणादायक गोष्टीऑफ द फिल्ड