musheer khan accident : इराणी चषकाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईच्या संघाला मोठा झटका बसला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाचा भाग असलेला मुशीर खान स्पर्धेबाहेर होण्याची दाट शक्यता आहे. कानपूरहून लखनौकडे जात असताना मुशीरच्या वाहनाला अपघात झाला. अपघातावेळी मुशीरसोबत त्याचे वडील तथा प्रशिक्षक नौशाद खान हे देखील होते. मुशीरचा मोठा भाऊ सर्फराज खानने भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मेदांता हॉस्पिटलने मुशीरच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, मुशीरला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे पण सध्या त्याची प्रकृती ठीक आहे.
हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले की, २७ सप्टेंबर रोजी मुशीर खानच्या वाहनाचा अपघात झाला. पूर्वांचल एक्सप्रेसवरुन प्रवास करत असताना ही घटना घडली. त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. आमचे वरिष्ठ डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे. १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान मुंबई संघ शेष भारत संघाविरुद्ध इराणी चषकासाठी भिडेल. तसेच मुशीरची तब्येत ठीक असून, प्रवासासाठी योग्य झाल्यावर पुढील मदतीसाठी त्याला मुंबईला नेण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
मुंबईचा संघ -अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तोमर, सिद्धांत अधातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, जुनेद खान, रॉयस्टन डायस.
शेष भारत संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सारंश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चाहर.