अवघं क्रिकेट विश्व ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रमलं आहे. भारतीय संघानं सुरुवातीचे तीन सामने जिंकून सुपर-८ मध्ये प्रवेश केला. बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियानं यजमान अमेरिकेचा पराभव केला. अशातच मराठमोळा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरनं दिलेल्या अपडेट्सनं चाहत्यांना धक्का बसला. खरं तर शार्दुलच्या पायाची सर्जरी झाली असून, तो कमीत कमी ३ महिने क्रिकेटपासून दूर असणार आहे.
डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या शार्दुलला तेव्हा दुखापत झाली होती. त्यानं भारतासाठी शेवटचा सामना सेंच्युरियन येथे आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. या सामन्यात त्याला केवळ एक बळी घेता आला. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना ३२ धावांनी जिंकून भारतीय संघाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न भंग केलं होतं.
शार्दुलच्या पायावर शस्त्रक्रियाआफ्रिका दौऱ्यावरून मायदेशात परतताच शार्दुलनं रणजी करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळत असलेल्या मुंबईच्या संघानं पुन्हा रणजी करंडक उंचावला. मुंबईला ४२ वा किताब जिंकून देण्यात शार्दुलची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यानं या स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये २५५ धावा केल्या आणि १२ बळी घेतले. उपांत्य फेरीत तामिळनाडूविरूद्ध शतकी खेळी करून शार्दुलनं चमकदार कामगिरी केली. यासह त्याला चार बळी घेण्यात यश आलं. शार्दुल ठाकूरच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करून याबाबत माहिती दिली. यापूर्वी मे २०१९ मध्ये देखील त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये शार्दुल ठाकूर संघर्ष करताना दिसला. त्यानं ९ सामन्यांमध्ये केवळ ५ बळी घेतले. यादरम्यान त्याची सरासरी ९.७६ अशी राहिली. आरसीबीविरूद्ध 'करा किंवा मरा'च्या सामन्यात शार्दुलची बेक्कार धुलाई झाली होती. या सामन्यात केवळ २ बळी घेतलेल्या शार्दुलनं ४ षटकांत तब्बल ६१ धावा दिल्या.