टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामात पंजाब किंग्जचं (PBKS) नेतृत्व करणार आहे. गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यानंतर शिखरला टीम इंडियातून वगळण्यात आलं होतं. अशा स्थितीत आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून त्याला पुनरागमन करण्याची संधी आहे. दरम्यान, शिखर धवननं एका मुलाखतीदरम्यान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर मोठं भाष्य केलं आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये शिखर धवनच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला, जेव्हा त्याची पत्नी आयशा मुखर्जीनं त्यांचं जवळपास नऊ वर्ष जुनं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. लग्न मोडण्यास आपणच जबाबदार असल्याचं शिखरनं सांगितलं. आजतकला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिखरनं अनेक विषयांवर भाष्य केलं.
“मी अपयशी ठरलो कारण कोणीही निर्णय घेतो तेव्हा अंतिम निर्णय त्याचाच असतो. मला इतरांकडे बोट दाखवायला आवडत नाही. मी अयशस्वी झालो कारण मला त्या क्षेत्राची कल्पना नव्हती. जर तुम्ही मला २० वर्षांपूर्वी विचारले असते, तर मला क्रिकेटबद्दलच्या या सर्व गोष्टी माहित नसत्या, ज्याबद्दल मी आज बोलत आहे. हा सर्व अनुभवाचा विषय आहे. व्यक्तीसोबत एक दोन वर्ष घालवा आणि दोघांचेही संस्कार जुळतात का पाहा,” असं शिखर यावेळी म्हणाला.
"ती एक मॅचच"“ती एक मॅचच होती. माझ्या घटस्फोटाची केस सुरू आहे. हे संपल्यानंतर मला जेव्हा विवाह करायचं असेल, तेव्हा मी यात अधिक समंजस झालेलो असेन की मला कशाप्रकारचा जोडीदार हवा आहे ज्याच्यासोबत मला आयुष्य घालवायचं आहे. जेव्हा मी २६-२७ वर्षांचा होतो तेव्हा मी खेळत होतो आणि त्यावेळी माझं रिलेशन नव्हतं. जेव्हा मी प्रेमात पडलो तेव्हा मी रेड फ्लॅग्स पाहिले नाही. परंतु आता प्रेमात पडलो तर मी रेड फ्लॅग्स पाहू शकतो. जर तसं असेल तर मी त्यातून बाहेर पडेन,” असं त्यानं सांगितलं.
"लग्न माझ्यासाठी बाऊंसर"“लग्न माझ्यासाठी बाऊंसर होतं. पराभवही आवश्यक आहे. परंतु त्याला स्वीकारणं शिकलं पाहिजे. माझ्याकडून चूक झाली आणि माणूस चुकांमधूनच शिकतो,” असंही त्यानं स्पष्ट केलं. शिखर धवनं ऑक्टोबर २०१२ मध्ये आयशा मुखर्जीशी विवाह केला होता. २०१४ मध्ये त्यांच्या मुलाचा झोरावरचा जन्म झाला. सध्या तो आयशा मुखर्जीसह मेलबर्नमध्ये राहत आहे.