shreyas iyer and his mother : भारताच्या क्रिकेट संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर आणि त्याची आई रोहिनी अय्यर यांनी मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटची खरेदी केली. मुंबईच्या वरळी परिसरात त्यांनी २.९० कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले. मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार वरळीच्या आदर्श नगर भागात त्रिवेणी इंडस्ट्रियल सीएचएसएलच्या दुसऱ्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. ५२३ चौरस फूट आकाराचे अपार्टमेंट ५५,२३८ प्रति चौरस फूट दराने खरेदी केल्याचे कळते.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यवहाराची नोंदणी १९ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आली होती. घर खरेदीमुळे या आधी देखील अय्यर चर्चेत आला होता. रिअल इस्टेट व्यवहारांमुळे श्रेयस अय्यर चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरे तर मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही अय्यरचे घर आहे. सप्टेंबर २०२० मध्ये श्रेयस अय्यरने द वर्ल्ड टॉवर्सच्या ४८व्या मजल्यावर २३८० चौरस फुटांचे अपार्टमेंट विकत घेतले होते. या अपार्टमेंटमध्ये तीन कार पार्क होतात, असे Zapkey ने दाखवलेल्या कागदपत्रांमधून समजते. दरम्यान, वरळी हा मुंबईतील एक प्रतिष्ठित परिसर आहे. येथील घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे चित्र पाहायला मिळते.
अय्यर सध्या भारतीय संघाबाहेर आहे. मागील काही कालावधीपासून संघर्ष करत असलेला अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरला सध्या सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तो दुलीप ट्रॉफीमध्ये दिसला होता. इराणी चषक आणि रणजी ट्रॉफीमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर श्रेयस आता भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असेल. बांगलादेशनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.