virat kohli and anushka sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूड आणि क्रिकेटमधील सर्वात चर्चेत असणारे जोडपे. विरुष्काची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. या जोडप्याने अनेकदा त्यांच्या चाहत्यांना सरप्राईज दिल्याचे पाहायला मिळाले आहे. आता अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळताना दिसली. तिने विराटला आव्हान दिले की, ती क्रिकेटमध्ये त्याला हरवू शकते. एवढेच नाही तर भन्नाट नियमांची लांबलचक यादीही तिने वाचून दाखवली. या अनोख्या डावात अनुष्काने अशी गोलंदाजी केली विराट देखील पाहतच बसला.
खरे तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अलीकडेच एका स्पोर्ट्सवेअर ब्रँडचा प्रमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट एकमेकांना क्रिकेटमध्ये आव्हान देताना दिसतात. अनुष्काने कोहलीसोबत खेळण्यापूर्वी काही अटी सांगितल्या, ज्या ऐकून सर्वांनाच हशा पिकला.
दरम्यान, अनुष्का शर्मा नियम वाचून दाखवताना दिसते. ती विराटला सांगते की नियम क्रमांक एक, जर तीन वेळा चेंडू हुकला तर तू बाद. चेंडू तीनवेळा शरीराला लागला तरीदेखील बाद ठरवले जाईल. वाईट हावभाव केल्यावरही बाद घोषित होशील, असे अनुष्काने एकूण तीन नियम सांगितले. चौथा नियम सांगत असलेल्या अनुष्काला थांबवत विराटने खेळ सुरू करण्यास सांगितले. मग काय इथेही अनुष्काने आपल्या पतीची फिरकी घेत विराटला अवाक् केले.
विराट कोहलीने पहिल्या दोन चेंडूत अनुष्का शर्माला बाद केले. यानंतर जेव्हा अनुष्काची वेळ येते तेव्हा ती विराट कोहलीवर बाउन्सरचा मारा करते. इतकेच नाही तर ती वेळोवेळी नवनवीन नियम आणते, ज्यामुळे विराट कोहलीला राग येतो आणि तो खेळ मध्येच सोडून जातो.