Virat Kohli Anushka Sharma Alibaug House : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या विजयाचा जल्लोष साजरा करताच विराट कोहली लंडनला गेला. तिथे त्याची पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय आहे. विराटने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ७६ धावांची महत्त्वाची खेळी करून भारताच्या विजयात योगदान दिले. या योगदानाबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशातच किंग कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अलिबाग येथील त्याच्या बंगल्याची झलक दाखवली आहे. कोहलीच्या या बंगल्यासाठी कोट्यवधीचा खर्च आला आहे.
विराट कोहलीचा आलिशान बंगला समुद्रापासून काही अंतरावर आहे. एका विशिष्ट पद्धतीने हे घर बांधण्यात आले आहे. कोहलीच्या बंगल्यात अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. यात जिम आणि स्विमिंग पूल तसेच लांब पल्ल्याची मोकळी जागा आहे. कोहलीचे हे घर अधिक आकर्षित बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचे इंटीरियर बरेच आलिशान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे. किंग कोहलीच्या या आलिशान बंगल्याच्या उभारणीसाठी खूप वेळ लागला.
अलिबागमध्ये आवास येथील आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी याचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प बनविण्यात आला आहे. अनेक कलाकार, क्रिकेटर या प्रकल्पात बंगलो खरेदी करीत आहेत. अभिनेते राम कपूर व गौतमी कपूर यांनीही या प्रकल्पात २ घरे खरेदी केले आहेत. विराट कोहली हा सुद्धा या प्रकल्पाचा भाग झाला आहे. विराट कोहली याने तब्बल ६ कोटी रुपयांना एक घर खरेदी केले असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंना सध्या विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाची युवा ब्रिगेड ट्वेंटी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. पण, आगामी काळात श्रीलंकेत होणाऱ्या मालिकेसाठी विराटला संधी दिली जाते का हे पाहण्याजोगे असेल.