देशांतर्गत क्रिकेटकडं कानाडोळा केल्यामुळं बीसीसीआयनं इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर कारवाई केली आहे. त्या दोघांनाही वार्षिक करारातून वगळण्यात आलं आहे. अशातच भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला असल्याचं दिसते. देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता कामा नये असे मत साहानं मांडलं. पण, देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून खेळाडूंनी पुढे जाण्यासाठी रणनीती आखायला हवी असंही त्यानं सांगितलं.
बुधवारी बीसीसीआयनं वार्षिक करार यादी जाहीर केली. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना यातून डच्चू देण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट केलं की, इशान आणि श्रेयस यांच्या नावाचा विचार केला गेला नाही. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटकडं दुर्लक्ष केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई केली गेली असल्याचं बोललं जात आहे.
इशान-श्रेयसला डच्चू आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साहानं म्हटलं की, हा बीसीसीआयचा निर्णय आहे आणि संबंधित खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय असतो. त्यांना जर देशांतर्गत क्रिकेट खेळायचं नसेल तर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. खरं तर श्रेयस आणि इशान यांनी बीसीसीआयनं सांगूनही रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळं हे दोन्ही स्टार वादाच्या भोवऱ्यात सापडले.
त्याचं उदाहरण देताना साहा म्हणाला की, क्रिकेटपटूनं प्रत्येक सामन्याला समान महत्त्व दिलं पाहिजे. मी जेव्हा मी तंदुरुस्त असतो, तेव्हा मी खेळतो, अगदी क्लब सामनेही खेळलो आहे. मी स्थानिक क्रिकेटचेही सामने खेळलो असतो. मी नेहमीच प्रत्येक सामन्याला एक महत्त्वाचा सामना म्हणून पाहतो. माझ्यासाठी सर्व सामने समान असतात. जर प्रत्येक खेळाडूनं असा विचार केला तर तो त्याच्या कारकिर्दीत समृद्ध होईल आणि ते भारतीय क्रिकेटसाठीही चांगलं होईल.
खेळाडूंची करार यादी पुढीलप्रमाणे -
- ग्रेड A+ - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
- ग्रेड A - आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.
- ग्रेड ब - सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
- ग्रेड क - रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.