asia cup 2023 : आशिया चषकातील आपला सलामीचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघाने नेपाळचा पराभव करत सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. इतिहासात पहिल्यांदाच भारताविरूद्ध खेळत असलेल्या नेपाळच्या संघाने बलाढ्य भारताला झुंज दिली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नेपाळने अप्रतिम फलंदाजी केली. भारतीय संघाने क्षेत्ररक्षणादरम्यान केलेल्या चुकांचा फायदा घेत नेपाळने २३० धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांच्या घातक माऱ्याचा सामना करत नेपाळने ४८.२ षटकांत सर्वबाद २३० धावा केल्या. नवख्या नेपाळच्या खेळाडूंनी चुरशीची लढत दिल्याबद्दल भारतीय खेळाडूंनी त्यांचा सामन्यानंतर सत्कार केला.
नेपाळच्या संघाला आपल्या दोन्हीही सामन्यात पराभव पत्करावा लागला. सलामीच्या सामन्यात यजमान पाकिस्तानने नवख्या संघाचा २३८ धावांनी पराभव केला. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, भारताने नाणेफेक जिंकून नेपाळला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि नेपाळच्या सलामीवीर फलंदाजांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकामागून एक अनेक झेल सोडले. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवून सामन्यात पुनरागम केले.
नेपाळने सर्वबाद २३० धावा करून भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर पावसाचे आगमन झाले अन् सामना काही वेळ थांबवण्यात आला. अखेर डकवर्थ-लुईस नियमानुसार २३ षटकांत १४५ धावा करण्याचे लक्ष्य भारताला देण्यात आले. या लक्ष्याचा पाठलाग टीम इंडियाने एकही गडी न गमावता २०.१ षटकांत पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद (७४) आणि शुबमन गिलने नाबाद (६७) धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला.