Join us  

IPL 2023 मध्ये टीम इंडियाचे खेळाडू GPS डिव्हाइस घालून खेळणार, हे आहे कारण...

BCCI ने घेतलेल्या या निर्णयामागे नक्की काय आहे कारण, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 1:58 PM

Open in App

IPL 2023 Team India Cricketers with GPS Device: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल 31 मार्चपासून सुरू होत आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. भारताचे अव्वल क्रिकेटपटू आपापल्या संघांना विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंवर BCCI ची विशेष नजर असणार आहे. या लीगदरम्यान भारतीय खेळाडूंना दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी बीसीसीआयने विशेष व्यवस्था केली आहे. खरं तर, आयपीएलनंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड कपही आहे. त्यामुळे बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून सुरक्षित ठेवायचे असल्याने हा नवा 'प्लॅन' आणला आहे.

बीसीसीआय आयपीएलमध्ये खेळाडूंचा फिटनेस आणि थकवा जीपीएस डिव्हाईसच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. यासाठी बोर्डाने सर्व खेळाडूंना डिव्हाईस उपलब्ध करून दिले आहे. खेळाडूंना सराव आणि सामन्यादरम्यान ते वापरावे लागेल. डिव्हाईस खेळाडूंच्या फिटनेसशी संबंधित ५०० वेगवेगळ्या सूचना देईल. त्यात खेळाडूंची एनर्जी पातळी, धावलेले अंतर, ब्रेकडाऊनचा धोका, ह्दयस्पंदने, रक्तदाब आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. डिव्हाईसद्वारे खेळाडूंवरील वर्कलोड आणि जखमी होण्याची भीती आदींचे संकेत मिळू शकतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर २०१८ पासून काम सुरू होते, मात्र, २०२३ च्या १६व्या पर्वात याचा पहिल्यांदा वापर होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये प्रायोगिक तत्वांवर या डिव्हाईसचा वापर करण्यात आला. त्याचे चांगले निकाल आले आहेत. फ्रेंचायझींनाही याचा लाभ झाला. त्यांनी आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंचा उपयोग गरजेनुसार केला. या अनुभवाच्या आधारे डिव्हाईसचा वापर यंदाच्या IPL मध्ये करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावरील वर्कलोडचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL दरम्यान खेळाडूंच्या कामाचा ताण सांभाळला जाईल असा या मागचा हेतू असणार आहे. एका वृत्तानुसार, भारतीय संघातील बहुतांश खेळाडू GPS डिव्हाइस घालून मैदानात उतरणार आहेत. खेळाडू केवळ सरावाच्या वेळीच नव्हे तर सामन्यादरम्यानही परिधान करणार आहेत.

भारतीय खेळाडूंच्या वर्कलोडवर लक्ष-

टीम इंडियाला हे जीपीएस उपकरण घालावे लागेल जेणेकरून त्यांच्या फिटनेसवर लक्ष ठेवता येईल. या उपकरणाच्या माध्यमातून त्यांची ऊर्जा पातळी ते हृदयाचे ठोके, रक्तदाब यासारख्या गोष्टींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. हे उपकरण खेळाडूंना कधी विश्रांतीची आवश्यकता आहे आणि ते खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त केव्हा आहेत हे सांगेल. हे डिव्‍हाइस ऑस्ट्रेलिया आणि इंग्‍लंडच्‍या टीम देखील वापरतात. BCCI ला आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून सुरक्षित ठेवायचे आहे. अलीकडे जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा जायबंदी झालेत. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले आहे, कारण तो आशिया चषक किंवा टी२० विश्वचषक 2022 खेळलेला नाही. आता त्याच्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणे कठीण आहे. आता या डिव्हाईसचा टीम इंडियाला किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३बीसीसीआयजसप्रित बुमराह
Open in App