Shreyas Iyer Team India, IND vs AUS 4th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी२० सामना शुक्रवारी होणार आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रायपूरमध्ये अद्याप एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. १ डिसेंबरला येथे प्रथमच टी२० सामना खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. या दरम्यान आजच्या सामन्यात भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. शेवटच्या दोन षटकात भारतीय गोलंदाजांना ४० हून अधिक धावा असून बचाव करता आला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या संघातील गोलंदाजीत बदल दिसण्याची मोठी शक्यता आहे. भारताला पुनरागमन करून मालिका काबीज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात दाखल झालेल्या दीपक चहरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीत बऱ्यापैकी महाग ठरला आहे. अशा स्थितीत दीपक चहरचा त्याच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर संघात परतणार!
भारतीय संघासाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे अनुभवी श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन होत आहे. रायपूर टी-२० सामन्यापासून तो उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल. आयपीएल कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळवणाऱ्या तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर संघात सामील होऊ शकतो. तिलक वर्माला गेल्या तीन सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्याचा संघातून पत्ता कट होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे.
संभाव्य भारतीय संघ: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, दीपक चहर