Join us  

U-19 World Cup, Rajangad Bawa: युवा राज बावाने केला धडाकेबाज पराक्रम! मोडला शिखर धवनचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

राज बावाने तुफान फटकेबाजी करत १०८ चेंडूत नाबाद १६२ धावा कुटल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 4:36 PM

Open in App

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ४०५ धावा केल्या. या स्पर्धेतील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. पण हे आव्हान युगांडाला झेपले नाही. युगांडाचा संपूर्ण डाव १९.४ षटकांत ७९ धावांतच आटोपला. त्यामुळे भारताला ३२६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात चंदीगडचा अष्टपैलू खेळाडू राजनगड बावाने दीडशतकी खेळी केली. या दमदार खेळीच्या जोरावर त्याने एक नवा पराक्रम केला.

राजनगड बावाने शनिवारी युगांडाविरुद्ध भारतासाठी उत्कृष्ट खेळी केली. त्रिनिदादमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षाखालील पुरूष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ब गटात भारताकडून खेळताना त्याने १०८ चेंडूत नाबाद १६२ धावा ठोकल्या. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर बावाने पहिले शतक ठोकले. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ८ षटकारांची फटकेबाजी केली. या दमदार खेळीच्या जोरावर राजनगड बावा हा १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. २००४ साली बांगलादेशविरुद्ध शिखर धवनने १५५ धावांची खेळी केली होती. ती आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या होती. पण राजनगड बावाने शिखर धवनचा विक्रम मोडत नवा इतिहास रचला.

तत्पूर्वी, भारताचा सलामीवीर अंककृष्ण रघुवंशी याने १२० चेंडूत १४४ धावा केल्या. त्याला राजनगड बावाने दमदार साथ देत दीडशतक ठोकले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने ४०५ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाच्या खेळाडूंची भंबेरी उडाली. पास्कर मुरूगनी (३४) आणि रोनाल्ड ओपियो (११) या दोघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. राजवर्धनने ६ गडी टिपले आणि संघाला झटपट विजय मिळवून दिला.

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारतीय क्रिकेट संघशिखर धवन
Open in App