बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरण्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित शर्मानं वेगवेगळ्या प्रश्नांवर आपल्या खास अंदाजात रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित शर्माला बांगलादेश संघातील खेळाडूंकडून मालिकेआधी सुरु असलेल्या मैदानाबाहेरील स्लेजिंगच्या खेळाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित शर्माने आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर दिले.
मैदानात उतरण्याआधी बांगलादेशच्या खेळाडूंचा 'स्लेजिंग'चा खेळ
भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ भारतात दाखल झाला आहे. इथं आल्यापासून बांगलादेशच्या ताफ्यातील खेळाडू भारतीय संघाला पराभूत करण्यात मजा येईल, अशा प्रकारच्या शब्दांचा खेळ खेळत आहेत. यावरूनच रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला होता. बांगलादेशच्या संघातील खेळाडूंच्या या वक्तव्याबद्दल काय वाटते? असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला होता. यावर सर्वांना असेच वाटते, या वक्तव्यांकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही, असे त्याने म्हटले आहे.
रोहितनं चार चौघांत असं दिलं उत्तर
बांगलादेश संघाच्या ताफ्यातून उमटणाऱ्या कमेंट्सबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, "सर्वच संघांना टीम इंडियाला पराभूत करण्यात मजा वाटते. त्यांना मजा घेऊ द्या. ज्यावेळी इंग्लंडचा संघ इथं येतो त्यावेळी ते सुद्धा अशाच प्रकारची भाषा करतात. पण आमचा फोकस या गोष्टींकडे अजिबात नसतो. आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यावर भर देतो."
पाकमधील पराक्रम भारतात करण्याचं पाहताहेत स्वप्न
बांगलादेशच्या संघाने भारत दौऱ्याआधी पाकिस्तानच्या संघाला त्यांच्या घरात पराभूत करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. रावळपींडीत बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानला २-० असे पराभूत केले होते. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता ते भारतीय संघाला पराभूत करण्याची स्वप्न पाहत आहेत.
आम्ही चांगली तयारी केलीये
बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसह नव्या सत्राची सुरुवात दमदार करण्यासाठी सर्वोत्तम तयारी झाली आहे. चेन्नईमध्ये कॅम्पमध्ये आम्ही अनेक तास घाम गाळला आहे. काही खेळाडू दुलिप करंडक स्पर्धेतही खेळले आहेत. देशासाठी खेळताना प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील विजयासह आम्हाला WTC पॉइंट टेबलमधील स्थान आणखी मजबूत करायचे आहे, असेही रोहित शर्मा यावेळी म्हणाला.
Web Title: Team India Rohit Sharma On India vs Bangladesh Test Series Captain Hitman Says Sab Team Ko India Ko Harane Mein Maza Aata Hain Maza Lene Do Unhe
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.