नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. गेल्या वर्षी स्थगित करण्यात आलेला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना एक जुलैपासून एजबस्टन येथे खेळविण्यात येणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार विराट कोहली यांच्याकडून एक चूक झाल्याने बीसीसीआय नाराज झाले आहे. इंग्लंडमध्ये काही चाहत्यांनी दोन्ही स्टार क्रिकेटपटूंसह काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि रोहित-कोहली बीसीसीआयच्या रडारवर आले.
या मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होण्याआधीच रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर काही तासांनीच रोहित-कोहली यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांनी यावेळी मास्क लावलेले नसल्याने त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. त्यामुळेच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आणि खेळाडूंना चाहत्यांसोबत भेट घेणे आणि विनामास्क बाहेर फिरण्याबाबत सूचना केल्या आहेत. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात संघातील काही सदस्यांनी एका पुस्तक अनावरणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि त्यानंतर संघात कोरोनाची एंट्री झाली होती.
या कारणामुळेच पुन्हा एकदा संघातील दोन वरिष्ठ खेळाडू बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसल्याने बीसीसीआयवरील चिंता वाढली. बीसीसीआयने पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्यासह गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी एका संकेतस्थळाला सांगितले की, ‘यूकेमध्ये कोविडचे संकट कमी झाले आहे. पण असे असले, तरी खेळाडूंना सावध राहावे लागेल. आम्ही संघाला अधिक काळजी घेण्यास सांगू.’
न्यूझीलंडला बसला फटका
नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला आपला नियमित कर्णधार केन विलियम्सन आणि काही प्रमुख खेळाडूंविना खेळावे लागले होते.
कारण हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळेच बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना अधिक काळजी घेण्याबाबत बजावले आहे.
कसोटी सामन्यानंतर भारताला यजमान इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.
Web Title: Team India: Rohit Sharma, Virat Kohli made a big mistake, BCCI upset
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.