Team India Scenario for Semi Final of T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ गटात रविवारी धक्कादायक निकालाची नोंद केला. माजी विजेत्या ऑस्ट्रेलियावर त्यांनी विजय मिळवून ग्रुप १ मधील उपांत्य फेरीच्या शर्यतीची चुरस अधिक रंजक बनवली आहे. काल भारताने बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीच्या उंबरठ्यापर्यंत धडक दिली होती आणि त्यांचे स्थान हे निश्चित मानले जात होते. पण, अफगाणिस्तानच्या विजयाने आता समिकरण बदलले आहे आणि आता India vs Australia या सामन्याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
रहमुल्लाह गुरबाज ( ६०), इब्राहिम झाद्रान ( ५१) यांच्या दमदार ११८ धावांच्या भागीदारीनंतरही अफगाणिस्तानला २० षटकांत ६ बाद १४८ धावा करता आल्या. पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. अॅडम झम्पाने ( २-२८) मधल्या षटकात दिलेले झटके महत्त्वाचे ठरले. १४९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलिया सहज पार करेल असे वाटत असताना नवीन उल हकने सुरुवातीला धक्के दिले. ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस ही जोडी हावी होताना दिसली खरी, परंतु ८ गोलंदाज वापरूनही गुलबदीन नईबला गोलंदाजी देण्याचा कर्णधार राशिद खानचा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरला.
गुलबदीनने ४ षटकांत २० धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. नवीनने २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत १२७ धावांत तंबूत परतला. अफगाणिस्तानने हा विजय मिळवून ग्रुप १ मध्ये २ गुणांची कमाई केली आहे.
ग्रुप १ ची सद्यस्थितीभारतीय ( २.४२५) संघ २ विजय मिळवून ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी २ गुण आहेत, परंतु ०.२२३ नेट रन रेटसह ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे, तर अफगाणिस्तानचा -०.६५० असा नेट रन रेट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. हा सामना भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीतील त्यांचा प्रवेश पक्का होईल. पण, जर ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर त्यांचेही ४ गुण होतील. अफगाणिस्तानचा शेवटचा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध आहे आणि तो त्यांनी जिंकला तर त्यांचेही ४ गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.
भारतीय संघाचा नेट रन रेट हा जबरदस्त आहे आणि त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून माघारी पाठवण्यासाठी ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांना एकूण १२३ हून अधिक धावांनी आपापल्या साखळी फेरीत विजय मिळवावा लागेल. उदा. जर ऑस्ट्रेलियाने भारतावर ३१ धावांनी विजय मिळवला, तर अफगाणिस्तानला बांगलादेसवर ९३ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.