Join us  

Hardik Pandya : हार्दिक पांड्याबाबत निर्णय घेण्यासाठी BCCIचं वेट अँड वॉच, रोहित शर्माचं MIच्या खेळाडूबाबत मोठं विधान!

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) टीम इंडियाच्या १५ खेळाडूंमध्ये निवड झालीय खरी, परंतु आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील त्याची कामगिरी BCCIसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 10:40 PM

Open in App

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) टीम इंडियाच्या १५ खेळाडूंमध्ये निवड झालीय खरी, परंतु आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील त्याची कामगिरी BCCIसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आज १० ऑक्टोबरपर्यंत संघांना त्यांच्या जाहीर केलेल्या संघात बदल करण्याची मुभा होती आणि त्यात पाकिस्तान,  श्रीलंका यांनी संघात बदल केले, पण सर्वांचे लक्ष लागले होते ते टीम इंडियाच्या निवड समितीच्या निर्णयाकडे. सुधारित माहितीनुसार आयसीसीनं सुपर १२मध्ये खेळणाऱ्या संघांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन ठेवली आहे आणि निवड समितीनं तोपर्यंत हार्दिक पांड्याचा निर्णय राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) हार्दिकबद्दल मोठं विधान केलं आहे.

हार्दिकनं आयपीएल २०२१त १४.११च्या सरासरीनं १२७ धावा केल्या आहेत. मागील आठवड्यात MIचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी हार्दिकनं गोलंदाजी केली, तर त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होण्याची भीती व्यक्त केली होती. पण, आयपीएलमध्ये गोलंदाजीचा वर्कलोड न घेताही हार्दिक फलंदाजीत अपयशी ठरला. तरीही रोहितनं त्याची पाठराखण केली आहे. हार्दिक हा मौल्यवान संपत्ती असल्याचे मत त्यानं व्यक्त केलं. Rohit Sharma backed Hardik, calling him a valuable asset. हार्दिकनं यूएईत पार पडलेल्या आयपीएल २०२१तील पाचही सामन्यात एकही चेंडू फेकला नाही आणि ही गोष्ट वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरू शकते. 

रोहित म्हणाला,''दिवसेंदिवस हार्दिकच्या तंदुरुस्तीत सुधारणा होता आहे, परंतु तो गोलंदाजी कधी करू शकेल, है वैद्यकिय तज्ज्ञच सांगू शकतील. फिजिओ, ट्रेनर आणि वैद्यकिय टीम त्याच्या तंदुरुस्तीसाठी काम करत आहेत. फलंदाज म्हणून त्यानं निराश केलं आहे, परंतु आपल्या सर्वांना त्याचे कौशल्य माहित्येय. त्याच्या फलंदाजीवर तोही नाराज आहे, परंतु त्याच्या क्षमतेवर त्याला विश्वास आहे. माझा स्वतःचाही त्याच्यावर विश्वास आहे. एक चांगली खेळाडू अन् तो पूर्वीसारखा खेळेल. त्यानं यापूर्वीही हे करून दाखवलं आहे.''

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात MIचे चारपेक्षा अधिक खेळाडू आहेत. जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, हार्दिक, सूर्यकुमार यादव, इशान किशन व राहुल चहर हे वर्ल्ड कप संघात आहेत. बुमराह वगळता अन्य खेळाडूंनी निराश केले आहे. सूर्यकुमार व इशान यांनी अखेरच्या साखळी सामन्यात दमदार खेळ केला. रोहित म्हणाला,'' आयपीएलमधील कामगिरीबाबत काय लिहिले जातेय, ते मी वाचत नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ही वेगळी स्पर्धा आहे. जेव्हा तुम्ही फ्रँचायझी क्रिकेट खेळता, तेव्हा ती वेगळी स्पर्धा असते. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीचा तुम्ही मार्कर म्हणून उपयोग करू नका. त्या कामगिरीचे मुल्यमापन होते, हो हे खरं आहे, परंतु तो वेगळा संघ असतो...'' 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१हार्दिक पांड्यारोहित शर्मा
Open in App