एम्सटर्डम : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने रोमांचक विजयाची नोंद करताना बलाढ्य आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँडला २-१ असे नमवले. गरजांत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजयात योगदान दिले.
दखल घेण्याची बाब म्हणजे, मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने संघात तब्बल नऊ ज्यूनिअर खेळाडूंना संधी दिली. तरीही बलाढ्य नेदरलँडला पराभूत करण्यात भारत यशस्वी ठरला. आक्रमक खेळ केलेल्या भारताने गुरजांत (चौथा मिनिट) व मनदीप (५१वा मिनिट) यांच्या जोरावर बाजी मारली. यासह भारताने तीन सामन्यांची मालिकाही जिंकली. याआधी १३ आॅगस्टला भारताने नेदरलँडला ४-३ असा धक्का दिला होता.
आक्रमक सुरुवात करताना भारताने यजमान नेदरलँडला दबावाखाली ठेवण्यात यश मिळवले. भारताने चौथ्याच मिनिटाला शानदार गोल करून आपला इरादा स्पष्ट केला. गुरजांतने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत भारताला आघाडी मिळवून दिली. ड्रॅग फ्लिकर वरुण कुमारने मारलेला फटका नेदरलँडच्या गोलरक्षकाने अडवला. परंतु, रिबाउंडवर गुरजांतने रिवर्स शॉट मारत भारताचे खाते उघडले. अरमान कुरेशी यालाही गोल करण्याची संधी मिळाली. परंतु, त्याने मारलेला फटका गोलपोस्टच्या अगदी जवळून गेला.
दुसºया क्वार्टरच्या सुरुवातीलाच नेदरलँडला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु गोलरक्षक आकाश चिक्ते याने अप्रतिम बचाव केले. यानंतर नेदरलँडने प्रतिआक्रमण करताना भारताला दडपणाखाली आणून तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु, आकाशने जबरदस्त बचाव करताना नेदरलँडला गोल करण्यापासून दूर राखले. मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी घेतली.
तिसºया क्वार्टरमध्ये नेदरलँडने बरोबरी साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, भारताने मजबूत बचावाचे प्रदर्शन करताना पुन्हा एकदा नेदरलँडला गोल करण्यापासून रोखले. तसेच, अंतिम १५ मिनिटांमध्ये भारताने पुन्हा आक्रमण केले. या वेळी भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मनदीपच्या शानदार ड्रॅगफ्लिकच्या जोरावर भारताने २-० अशी आघाडी मिळवली. नेदरलँडचे प्रयत्न फोल ठरवले. सामन्यातील अखेरची तीन मिनिटे शिल्लक असताना नेदरलँडने तुफान आक्रमण करताना भारतीय गोलपोस्टवर तीन हल्ले केले. हे तिन्ही आक्रमण सूरजने रोखले. ५८व्या मिनिटाला नेदरलँडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. सँडर डी विनने गोल करत संघाची पिछाडी १-२ अशी कमी केली. यानंतर बचावावर अधिक भर देत भारतीयांनी सामना जिंकला.
>आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली, त्यामुळे आम्ही नेदरलँडविरुद्ध विजय मिळवू शकलो. नेदरलँड संघ खूप अनुभवी असून त्यांच्या ८ हून अधिक खेळाडूंना १०० पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळेच अशा मजबूत संघाला नमविण्यासाठी आम्हाला विशेष कामगिरी करण्याची आवश्यकता होती.
- मनप्रीत सिंग, कर्णधार
Web Title: Team India series win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.