नवी दिल्ली: पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकणारा भारतीय संघ बुधवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. दुसरीकडे, बांगलादेश संघ मुसंडी मारून मालिकेत आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या सामन्यात जी कामगिरी केली ती पाहता पाहुण्या संघासाठी मुसंडी मारणे सोपे असणार नाही. ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गजांना विश्रांती दिल्यानंतरही भारताने सामन्यावर पकड निर्माण केली. त्यावरून भारताला राखीव फळीची ताकद अनुभवता आली. यष्टिरक्षक संजू सॅमसन चमक दाखविण्यास इच्छुक आहे.
२०१५ ला पदार्पण करणारा हा खेळाडू कामगिरीतील सातत्याअभावी आत-बाहेर होत राहिला. तो मधल्या फळीत खेळतो; पण पहिल्या सामन्यात सलामीला आला होता. पुढील दोन्ही सामन्यांत तो याच स्थानावर खेळणार असल्याचे सूर्याने आधीच स्पष्ट केले आहे.
अभिषेक शर्मा हा दुसरा सलामीवीर म्हणून कायम असेल. पहिला सामना जिंकणाऱ्या भारतीय संघात बदल होण्याची शक्यता नाही. बांगलादेशला मालिकेत चुरस कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वपूर्ण झाले आहे. त्यांच्या फलंदाजांनी निराश केले. कर्णधार नजमुल हुसेन शंटो याने पराभवानंतर कबुली दिली की, १८० धावांचे लक्ष्य कसे गाठायचे ते फलंदाजांना समजले नाही. तथापि, आम्ही फारच खराब खेळलो नाही आणि पुनरागमनाची शक्यता संपलेली नाही, असा आशावाद शंटोने व्यक्त केला होता.
महमूदुल्लाह टी-२० तून निवृत्त होणार
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाह हा भारताविरुद्ध तिसरा आणि अखेरचा सामना खेळल्यानंतर टी-२०तून निवृत्त होणार आहे. अखेरचा सामना शनिवारी हैदराबाद येथे होईल. महमूदुल्लाहने मंगळवारी ही घोषणा केली. ३८ वर्षाच्या या खेळाडूने २००७ ला पदार्पण केले. तो बांगलादेशसाठी ५० कसोटी, २३२ वनडे आणि १३९ टी-२० सामने खेळला आहे. माजी कर्णधार राहिलेल्या महमूदुल्लाहने २०२१ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
सामना : सायंकाळी ७ पासून, प्रक्षेपण : स्पोर्टस १८ नेटवर्क, लाइव्ह स्ट्रिमिंग : जियो सिनेमा